नूतन मंदिरामध्ये ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण उत्साहात
दावडी येथील जाधववाडीत त्रिमूर्ती सेवा मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम
खेड : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील ऐतिहासीक वसा आणि वारसा लाभलेल्या दावडी गावातील जाधववाडी (जाधवदरा) येथे श्री दत्तगुरू, श्री गणपती, श्री विठ्ठल रखुमाई या देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा नुकताच पार पडला. तब्बल एक तपानंतर नूतन मंदिर या भागामध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या स्वनिधीतून साकार झाले असल्याने स्थनिकांमधून आभार व्यक्त केले जात आहेत.
आमदार मोहिते पाटील, कैलासराव सांडभोर पाटील यांच्या पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून मंदिर उभारणीसाठी व परिसर विकासासाठी मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर जाधव व उपाध्यक्ष मारुती जाधव यांनी सांगितले.
मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण निमित्ताने दावडी गावातून जाधववाडी येथील मंदिरापर्यंत फुलांनी सजविण्यात आलेल्या ट्रॅक्टरमध्ये मूर्त्या ठेऊन वाजंत्री व ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली होती.
या मिरवणुकीत डोक्यावर कलश घेऊन महिला मोठ्या संखेने सहभागी झाल्या होत्या. तसेच जाधववाडी येथील दत्त प्रासादिक भजनी मंडळ व आळंदी येथील वारकरी संप्रदायातील बालकांचे शिस्तबद्ध चालीतील भजनाने नागरिकांची मने जिंकून घेतली. यावेळी महिला व लहान मुलांनी फुगडया व संगीताच्या तालावर फेर धरून नाचण्याचा आनंद लुटला.
या मिरवणुकीत मोठया प्रमाणात ग्रामस्थ, तसेच महिला, तरुण सहभागी झाले होते. यावेळी दावडीतील विविध संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, ग्रामपंचायत सदस्य, तसेच भाविक भक्त सहभागी झाले होते. चास येथील शिवदत्त महाराज यांचे हस्ते मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रम संप्पन झाला. त्यांच्या बरोबरीने पौराहित्य करणे कामी शांताराम महाराज जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले. सायंकाळी ह. भ. प. ब्रह्मानंदस्वामी महाराज यांचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी संपूर्ण मंदिरावर विदयुत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मंडळाचे सचिव बाजीराव जाधव यांनी मिरवणुकीचा ट्रॅक्टर, मंदिर व सभामंडप या भागात आकर्षक फुलांची तोरणे व विविध फुलांनी नेत्रदीपक सजावट केली होती.
या कार्यक्रम उत्साहात पार पडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर जाधव, उपाध्यक्ष मारुती जाधव, साहेबराव जाधव, सचिव बाजीराव जाधव, शांताराम जाधव, नवनाथ जाधव, संतोष जाधव, रामदास जाधव, गणेश जाधव, बाळासाहेब बाबुराव जाधव, बाळासाहेब सहादु जाधव, मुकुंद जाधव, कोंडीभाऊ जाधव, अॅड. कृष्णा भोगाडे, सुधाकर जाधव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन प्रकाश शिंदे यांनी केले.