पुणे जिल्हा ग्रंथोत्सव २०२२’ चे उद्घाटन…
समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ग्रंथ चळवळ महत्वाची : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे । सह्याद्री लाइव्ह । “समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ग्रंथ चळवळ महत्वाची आहे. ग्रंथात संपूर्ण जीवन बदलण्याची क्षमता असल्याने डिजीटल क्रांतीच्या युगातही नवे ज्ञान संपादन करून व्यक्तिमत्व विकसीत करण्यासाठी ग्रंथ वाचन गरजेचे आहे”, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घोले रोड येथील पंडीत जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवनात आयोजित ‘पुणे जिल्हा ग्रंथोत्सव २०२२’ तसेच ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे होते.
यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, शासकीय विभागीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल सुरेश रिद्धीवाडे, सहायक ग्रंथालय संचालक अर्चना काळे, कवी विसुभाऊ बापट, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक सोपानराव पवार, तहसीलदार राधिका हावळ-बारटक्के, खेड तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर आदी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, “ग्रंथ हेच खऱ्या अर्थाने ज्ञानाचे वाहक आहेत. पुण्याच्या सांस्कृतिक विकासात ग्रंथ चळवळीचे मोठे योगदान आहे. एखाद्या गोष्टीकडे तंत्रशुद्ध पद्धतीने, चिकित्सक वृत्तीने बघण्याचे ज्ञान ग्रंथामधून मिळते. आजच्या स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी ग्रंथ वाचनाशिवाय पर्याय नाही. ग्रंथोत्सवामुळे वाचन संस्कृती विकसित होण्याबरोबरच ग्रंथाविषयी रुची निर्माण होण्यास मदत होईल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डिजीटल वातावरणातही पुस्तकांचा स्पर्श प्रेरक : भारत सासणे
कार्यक्रमाचे अध्यक्ष सासणे म्हणाले, “डिजीटल साधनांकडे नव्या पिढीचा कल वाढत असताना अशा वातावरणातही पुस्तकांचा स्पर्श आणि त्याच्याशी असलेली मैत्री प्रेरक आहे. अनेक समस्यांवर मात करण्याची शक्ती त्यातून प्राप्त होते. पुस्तक वाचनाने मिळणारा आनंद विलक्षण असतो. जीवनाच्या विविध टप्प्यांवर मार्गदर्शन करण्याचे कार्य ग्रंथ करीत असतात. ग्रंथ हे आपले गुरु आणि त्याबरोबरच मित्र आहेत. ते आपल्याला मित्रत्वाच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत असतात. म्हणूनच पुस्तकांना केंद्रबिंदू ठेऊन जगभरात वाचन संस्कृतीच्या विकासासाठी प्रयत्न होत आहेत.”
“कुमारावस्थेत वाचनामुळे संस्कार होऊन व्यक्तिमत्वाचा विकास होण्यास मदत होते. बाल्यावस्थेत वाचनामुळे झालेले संस्कार आयुष्यात कायमस्वरुपी उपयोगी पडतात. पुस्तकांच्या सानिध्यात आल्याने वाचन होते, वाचनातून संस्कार होतात आणि व्यक्ती सकारात्मक विचार करतो. संकटकाळात ग्रंथचळवळीचे महत्वपूर्ण मार्गदर्शन मिळते. एकंदरीत जीवन यशस्वी होण्यास मदत होते. त्यामुळे वाचन चळवळीचा प्रसार आणि प्रचार वेगवेगळ्या स्तरावर होण्याची गरज आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून समाजात वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत होते”, असेही ते म्हणाले.
जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे म्हणाले, “अशा उत्सवातून आनंद घ्यायचा असतो. वाचन संस्कृती समाजात रुजली पाहिजे. केरळमध्ये भारतातील पहिल्या बुक व्हिलेजची निर्मिती झाली. त्यानंतर महाराष्ट्रातील भिलार हे पुस्तकांचं गाव निर्माण झालं. अशा ठिकाणी दोन दिवस मुक्कामी गेलं पाहिजे. युनेस्कोने स्ट्रान्सबर्ग हे जगातील बुक कॅपिटल घोषित केले आहे. तरुण पिढीत वाचन संस्कृती कमी होत चालली आहे असं म्हटलं जातं. आता तरुणांनी इलेक्ट्रॉनिक पडद्यावरचे वाचन करण्यापेक्षा पुस्तकांचे वाचन करावे.”
डॉ. मोघे पुढे म्हणाले, “कोरोनात वृत्तपत्रे स्पर्श नको म्हणून अनेक वाचकांनी वर्गणी बंद केली. मात्र घरातील सर्व लहानथोर मंडळींनी वृत्तपत्रांसह विविध पुस्तके व ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. ग्रंथ हे आपले मित्र आहेत. आपल्या तारुण्यात, कुमार अवस्थेत वाचनाचे वेगवेगळे टप्पे वाचले पाहिजेत. दुर्मिळ पुस्तकांचेही ग्रंथोत्सवात दालन करावे, अशी सूचना करून कुमारवयीन मुलांना या पुस्तक प्रदर्शनास भेट देण्यास उद्युक्त करावे.” असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात गोखले म्हणाल्या, “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि ग्रंथालय कार्यालयाच्या स्थापनेचे रौप्य महोत्सवी वर्षाचा दुहेरी संगम आणि ग्रामीण व शहरी भागात वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी तसेच त्याची जोपासना होण्यासाठी ग्रंथ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.”
दुपारच्या सत्रात सुनीलकुमार लवटे यांचे सार्वजनिक ग्रंथालयांची उर्जित अवस्था, गौरी लागू यांचे जी एं च्या कथांचे अभिवाचन आणि विसुभाऊ बापट यांचे कुटुंब रंगले काव्यात हे कार्यक्रम पार पडले.
पूजा दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले, तर ग्रंथालय निरीक्षक श्रीकांत संगेपांग यांनी उपस्थितांचे आभार मानले.
ग्रंथदिंडीने शुभारंभ :-
पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांच्या हस्ते मनपा भवन येथून ग्रंथ दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. बालगंधर्व मंदीर चौक मार्गे पुढे पंडीत जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन, घोले मार्ग, शिवाजीनगर येथे या ग्रंथदिंडीचा समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे सर्व संचालक, विविध तालुक्यातील ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह बाजीराव रोड येथील नूतन मराठी महाविद्यालय आणि गुरुवार पेठ येथील सेंट हिल्डाज् माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बुधवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप :-
जिल्हा ग्रंथोत्सवाचा समारोप बुधवारी सायंकाळी 4 वाजता पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सकाळच्या सत्रात 11.30 वाजता ऋचा थत्ते यांचा ‘सुचलेलं काही…वेचलेलं काही’ हा कार्यक्रम होणार आहे. तर अर्पणा निरगुडे आणि अजित कुंटे यांचे कथाकथन होईल. तसेच बालप्रवचनकार हभप. चैतन्यमहाराज थोरात यांचे दुपारी 3 वाजता ग्रंथविषयी प्रवचन होणार आहे. ग्रंथ प्रदर्शन व विक्री बुधवार 16 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत सुरू राहणार असून यात विविध विषयांच्या पुस्तकांसोबतच शासकीय प्रकाशनेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.