लाभार्थी उद्योजकांच्या व्यवसायांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई । सह्याद्री लाइव्ह। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांच्या व्यवसायाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. नवउद्योजकांना त्यांच्या फूड व्हॅन आणि प्रवासी टॅक्सीच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आल्या.
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ येथे निवड झालेल्या सहा उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आले. यात आशिष जाधव, हर्षाली धनगर, भरत गांजले, रूपाली साखरे, लक्ष्मण शिंदे आणि विनोद राऊत यांचा समावेश होता.
अन्न व्यवसाय आणि प्रवासी वाहतूक सुरू केलेल्या 60 उद्योजकांच्या व्यवसायाचा आज शुभारंभ करण्यात आला. यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात शोभा भंडारे, उत्कर्ष तारी, रूपाली सालेकर, स्नेहा आव्हाड आणि उमेश सोनवणे यांना वाहनाच्या चाव्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. यासह 14 जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेण्याची सक्ती होती. राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविली आहे.
खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांच्या पुढाकाराने उद्योग विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.