डॉ नितीन राऊत यांच्याकडून एकाच दिवशी ३८ नागरी विकास कामांचा शुभारंभ
नागपूर : लोकशाहीमध्ये विकासाचे हात सार्वजनिक असतात लोकांचे असतात आज तुमच्या हाताने तुमच्या भागातले विकास काम होत आहे. मी मात्र निमित्तमात्र असून या ठिकाणावरून ऑनलाइन आपल्याशी संवाद साधतो आहे, लोकशाहीची ही ओळख असून आज मतदार संघात एकाच वेळी अनेक ठिकाणच्या कामाचा शुभारंभ होत असल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज येथे केले.
मानकापूर क्रीडा संकुल येथून आज उत्तर नागपुरातील एकाच वेळी 38 कामाचा शुभारंभ करण्यात आला. इंदोरा, नारी, हंसापुरी,मिलिंद नगर, बिनाकी मंगळवारी, इतवारी स्टेशन रोड, सिद्धार्थ नगर ,ज्योती नगर ,वंजारी लेआउट, धम्मानंद नगर, रमाई नगर, मांजरा, शिवनगर, महाडा कॉलनी, विरगाव, कळमना परिसरातील बेलानगर, कामना नगर, तुकाराम नगर, विनोबा भावे नगर, छत्तीसगड कॉलनी, यशोधरा नगर, गरीब नवाज नगर, सुरा, मज्जित मेन रोड, आदी भागातील 38 ठिकाणी कार्यकर्ते ऑनलाइन उपस्थित होते. त्या सर्वांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला.
यावेळी जिल्हाधिकारी आर. विमला, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, आदी उपस्थित होते. तसेच उत्तर नागपूर प्रभारी रत्नाकर जयपुरकर, कार्यालयीन सचिव लालाजी जयस्वाल, ब्लॉक अध्यक्ष सुरेश पाटील, सचिन कोटांगळे, दीपक खोबरागडे, बालमुकुंद जनबंधू, मूलचंद मेहर, ललित कुमार बारसागडे आदी उपस्थित होते.
कोरोना पार्श्वभूमीवर अनेक विकास कामांना सुरू करता आले नाही. त्यामुळे कामे प्रलंबित आहेत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात कामे सुरू करावीत, अशी इच्छा असताना पुन्हा एकदा शहर व राज्य तिसऱ्या लाटेच्या प्रारंभावर येऊन ठेपले आहे. अशावेळी एकमेकांची काळजी घेणे गरजेचे असून विकास कामेही सुरु रहावेत म्हणून नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकाच वेळी कार्यकर्त्यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आपल्या भागात सुरू असणाऱ्या विकास कामांचा दर्जा चांगला राहावा, यासाठी प्रत्येक नागरिकांनी सजग असावे. कामे दर्जेदार होतील याची काळजी घ्यावी. आपल्या घरच्या कामाप्रमाणे या कामांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. शहरातील नागरिकांनी नव्या कोरोना लाटेचे वाढते रुग्ण बघता कोणीही दोन्ही डोस घेतल्याशिवाय राहू नये, महाराष्ट्रामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे व नागपूर शहर कोरोना उद्रेकाच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. मास्क वापरावे, अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.