यंदाच्या मॉन्सून हंगामात महाराष्ट्रात कमी पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
नवी दिल्ली । सह्याद्री लाइव्ह । यंदाच्या मॉन्सून हंगामात महाराष्ट्रात कमी पावसाचे संकेत आहेत. हवामान विभागाने मॉन्सून पावसाच्या वितरणाबाबत जाहीर केलेल्या नकाशानुसार, महाराष्ट्राच्या बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. मात्र मे महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात येणाऱ्या सुधारित अंदाजात मॉन्सूनचे महाराष्ट्रातील वितरण अधिक स्पष्ट होऊ शकेल.
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा सर्वसाधारण म्हणजेच ९६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी (ता. ११) जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक तफावत होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.
१९७१ ते २०२० कालावधीतील दीर्घकालीन सरासरीनुसार मॉन्सून हंगामात देशात ८७ सेंटिमीटर पाऊस सरासरीइतका मानला जातो, तर सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. यंदाच्या मॉन्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (३५ टक्के), तर दुष्काळाची शक्यता २२ टक्के असल्याचे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले.