कडूस गावामध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी अडवल्या एस. टी. बस
एकदा आंदोलन करूनही दखल न घेतल्यामुळे विद्यार्थी संतप्त
कडूस (ता. खेड) । सह्याद्री लाइव्ह । एकदा आंदोलन करूनही त्याची दखल न घेतल्यामुळे कडूस गावच्या संतप्त ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि. २१) पुन्हा एकदा या मार्गावरून जाणा-या एस. टी. महामंडळाच्या सर्व एस. टी. बस कडूस चौकात रोखल्या होत्या. गावातील जवळपास दिडशे विद्यार्थ्यांनी दोन तास एस. टी बस अडवून धरल्या होत्या. विशेष म्हणजे यामध्ये विद्यार्थीनींची संख्या अधिक होती.
काही दिवसांपुर्वी राजगुरुनगर ते साबुर्डी जाणा-या एस. टी. आपला मार्ग बदलल्यामूळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी एस. टी. बस अडवून आंदोलन केले होते. आंदोलनानंतर राजगुरुनगर आगार प्रमुख पल्लवी पाटील यांनी संपूर्ण माहिती घेऊन सोमवारपासून एस.टी. बस पुर्ववत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू अजूनही सेवा पुर्ववत झाली नसल्यामुळे विद्यार्थ्यानी पुन्हा एकदा आंदोलन केले.
काही दिवसांपुर्वी कडूस गावामध्ये एस. टी. चालकासोबत झालेल्या वादामुळे चालकाला ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे गावामध्ये एस. टी. बस न थांबता जात होती. परंतू या सगळ्यामध्ये राजगुरुनगरला शिकण्यासाठी जाणा-या जवळपास दिडशे विद्यार्थ्यांची आणि ग्रामस्थांची गैरसोय होत होती.