राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : जिल्ह्यातील कोविड बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य शासनाच्या कोविडविषयक नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. पुढील आठवड्यातील कोविड संसर्गाची परिस्थिती पाहून निर्बंधात बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले.
विधान भवन येथे आयोजित पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, जि.प.अध्यक्ष निर्मला पानसरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, कोविड बाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने तूर्तास जिल्ह्यातील निर्बंध राज्य शासनाच्या नियमावलीनुसारच राहतील. ग्रामीण भागात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण चांगले झाले असून महापालिका क्षेत्रात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी शाळांच्या परिसरात लसीकरण मोहीम राबविण्याचा विचार करण्यात यावा. औषधालयातून कोविड चाचणी किट घेताना संबंधिताच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची नोंद घेण्याच्या सूचना औषध विक्रेत्यांना करण्यात याव्यात. जम्बो कोविड केंद्रातील सर्व सुविधा सज्ज ठेवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लशीची वर्धक मात्रा देण्याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही पवार म्हणाले.
गृहमंत्री वळसे-पाटील यांनी अवसरी येथील जम्बो कोविड केंद्रात आवश्यक सुविधा देण्याबाबत सूचना दिल्या. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा तयार ठेवाव्यात असेही ते म्हणाले.
विभागीय आयुक्त राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीविषयी माहिती दिली. जिल्ह्याने आतापर्यंत १ कोटी ६० लाख लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. १५ ते १८ वयोगटातील ४३ टक्के मुलांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोविड बाधितांच्या संख्येत ३० हजाराने वाढ झाली आहे. ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या ४ हजार ३८७ व्यक्तींनी लशीची वर्धक मात्रा घेतली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई
कोविडपासून बचावासाठी मुखपट्टी (मास्क) न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एकूण ९ हजार २७० कारवाईत ४५ लाख ३६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पोलिस विभागामार्फत मुखपट्टी वापरण्याबाबत नागरिकांचे प्रबोधनदेखील करण्यात येत आहे. महापालिका आणि नगर पालिकेतर्फेदेखील दंडात्मक कारवाईसोबत जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. कोविड नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू ठेवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, अशोक पवार, भीमराव तापकीर, राहूल कुल, सुनिल कांबळे, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, यशदाचे महासंचालक एस.चोक्कलिंगम, सह पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.
भारतीय जैन संघटना संस्थेच्या शांतीलाल मुथा यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या कोविडमुक्त गाव अभियानाची माहिती दिली. हे अभियान प्रत्येक गावात राबविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.