रायगड जिल्ह्यातील निसर्ग व वन पर्यटनाची कामे तात्काळ सुरू करा – वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : रायगड जिल्ह्यातील निसर्ग व वन पर्यटनाची प्रलंबित कामे तत्काळ सुरू करण्याचे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत आयोजित बैठकीत संबंधितांना दिले.
मंत्रालयातील दालनात रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य, फणसाड वन्यजीव अभयारण्य व देवकुंड धबधबा येथे पर्यटन विषयक विकास कामांसाठी आयोजित बैठकीत राज्यमंत्री भरणे बोलत होते. यावेळी बैठकीला पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, अप्पर प्रधान मुख्य वनसरंक्षक बेंझ, पर्यटन संचालक धनंजय सावळकर, दूरदृश्यप्रणालीद्वारे इको टुरिजमचे प्रधान मुख्य वनसंरक्षक गुप्ता, उपवनसंरक्षक सरोज गवस या बैठकीला उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे म्हणाले, पर्यटनाच्या अनेक संधी असलेल्या रायगड जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यांसह पर्यटकांचे विशेष आकर्षणाची ठिकाणे असलेली कर्नाळा पक्षी अभयारण्य, फणसाड वन्यजीव अभयारण, देवकुंड धबधबा, घारापुरी लेणी, डॉ. सी.डी. देशमुख जैवविविधता उद्यान आदी स्थळांचा विकास प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत करण्यात येत आहे. वन विभागाच्या निकषानुसार मान्यतेसाठी आवश्यक असलेल्या कामांचे प्रस्ताव इको टूरिझम बोर्डास तत्काळ सादर करावेत, अशा सूचना वन राज्यमंत्री भरणे यांनी आज दिल्या.
वन विभागाने रायगड जिल्ह्यातील प्रलंबित कामे प्राधान्याने करावीत – पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे
पर्यटन राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या की, पर्यटनसमृद्ध रायगड जिल्ह्यातील महत्त्वाची पर्यटन स्थळे ही वन विभागांतर्गत येतात. या पर्यटन स्थळांवर येणाऱ्या पर्यटकांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन विकास समिती व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे वनक्षेत्रातील ही विकासकामे निधीची उपलब्धता असताना तत्काळ व्हावीत. सर्व आवश्यक पूर्ततांसह प्रस्ताव विभागाने इको टूरिझम बोर्डास सादर करून सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी बैठकीत केल्या.