तुम्ही तुमच्या शेताची ई-पीक पाहणी केली आहे का? नसेल तर हे नक्की वाचा…
महाराष्ट्र । सह्याद्री लाइव्ह । नैसर्गिक आपत्तीमुळे नेहमीच शेतक-याच्या पीकाचे नुकसान होत असते. ब-याचदा शासनाकडुन या नुकसानीची भरपाई म्हणून काही आर्थिक मदत जाहीर झाल्याचंही तुम्ही ऐकलं असेल. पण या मदतीचा लाभ घेण्यासाठी पुर्ण करावी लागणारी प्रक्रिया बहुतांश शेतक-यांना पुर्ण करता येत नाही. याचं कारण म्हणजे या प्रक्रियेबद्दल असलेलं अज्ञान आणि ती पुर्ण करताना येणा-या अडचणी. शेतमालाच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी करावी लागणारी ही पाहणी तलाठी करतात. तरीही ब-याचदा बहुतांश शेतकरी या नुकसान भरपाई पासून वंचित राहतात.
भविष्यकालीन आपत्तींचे पुर्व नियोजन म्हणून व पीक पाहणीची ही अत्यावश्यक प्रक्रिया अधिक सोपी आणि शेतक-यांच्या सोईची व्हावी यासाठी शासनाने टाटा ट्रस्ट च्या मदतीने ‘ई-पीक पाहणी ॲप’ विकसित केले आहे. पीक पाहणी जलद व्हावी आणि या प्रक्रियेत शेतक-यांचा सक्रिय सहभाग असावा या हेतुने शासनाने हे मोबाईल ॲप बनवले आहे.
या ॲपद्वारे आपण स्वत: आपल्या स्मार्टफोनवरून ही ‘ई-पीक’ पाहणी करू शकतो.
कशी करावी ‘ई-पीक पाहणी’
१.‘शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या मोबाईल मधील Play Store App यामध्ये जाऊन ई पीक पाहणी (E Peek Pahani) अँप सर्च करून ते डाउनलोड करायचे आहे.
२. अँप डाउनलोड झाल्यावर त्याला ओपन करायचे आहे आणि तुमचा महसूल विभागाची निवड करायची आहे आणि पुढे जायचे आहे.
३. आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग, जिल्हा, तालुका, गाव याची निवड करायची आहे आणि पुढे जायचे आहे.
४. आता तुम्हाला तुमचे पहिले नाव/मधले नाव/आडनाव/खाते क्रमांक/गट क्रमांक यांपैकी एखादी माहिती भरून शोधा बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला खातेदाराची निवड करायची आहे.
५. आता तुम्हाला तुमचे खाते निवडून पुढे जायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला पीक पेरणी ची माहिती भरायची आहे.
६. आता तुम्हाला पिकांची निवड करायची आहे.
७. आता तुम्हाला पिकांसाठी सिंचन साधन आणि प्रकार निवडायचा आहे.
८. आता तुम्हाला तुमच्या पिकांचे फोटो अपलोड करायचे आहेत.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकांचे अक्षांश रेखांश सहित उभ्या पिकाचे छायाचित्र अपलोड करायचे आहेत.
अशा प्रकारे तुमची ई पीक पाहणी अंतर्गत पीक नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.