प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणतोय ‘हर हर महादेव’
महाराष्ट्र । सह्याद्री लाइव्ह । हिंदवी स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा गौरवशाली इतिहास रेखाटना-या चित्रपटांमुळे मराठी चित्रपटसृष्टी सध्या जोरावर आहे. असाच एक दमदार चित्रपट ‘हर हर महादेव’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दमदार गाणी आणि धमाकेदार टिझर्समुळे हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.
वीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या पराक्रमाची कथा सांगणारा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट २५ ऑक्टोबरपासून देशभरात प्रसिद्ध होणार आहे. हिंदी, तमिळ, तेलगु आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे.
राज ठाकरे यांच्या दमदार आवाज असलेला या चित्रपटाचा पहिला टिझर प्रेक्षकांचे लक्ष वेधत असतानाच आता बाजीप्रभुंची अंगावर काटा आणणारी दृष्य असलेला दुसरा टिझर निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे.
प्रतिभावंत आणि अष्टपैलु अभिनेता म्हणुन ओळख असलेले शरद केळकर या चित्रपटात बाजीप्रभुंच्या भुमिकेत दिसत आहेत. त्यांच्या अभिनयाची काही दृश्य प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणत आहेत. १ मिनिटांच्या या टिझरध्ये अंगावर शहारे आणणारे काही युद्धाचे क्षण प्रेक्षकांना मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचा अनुभव देऊन जातात.
अभिजित देशपांडे यांचं लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेत सुबोध भावे दिसतात. अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी सोनाबाईंची भुमिका साकारली आहे.
राज ठाकरेंचा दमदार आवाज आणि शरद केळकरांचा दमदार अभिनय अश्या ब-याच गोष्टींमुळे सध्या हा सिनेमा रिलिजपुर्वीच प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणत आहे.