आनंदवार्ता ! आता तळवडे आणि कोहिंडे बुद्रुकला मिळणार भामा आसखेडचे पाणी
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेतून दोन गावे होणार टँकरमुक्त
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । तळवडे आणि कोहिंडे बुद्रुक या दोन्ही गावांना थेट भामा आसखेड धरणातून शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारी बारमाही पाणी योजना मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. गावे टँकरमुक्त होणार असल्यामुळे गावकरी समाधान व्यक्त करत आहेत.
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेतून या गावांना भामा आसखेड धरणातून पाणी पुरवठा करण्याच्या कामाच्या नवीन ‘डीपीआर’ला नुकतीच प्रशासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. नवीन डीपीआरला तात्विक आणि तांत्रिक मान्यता देण्यात आली असून २ दिवसात या कामाची निविदा देखील प्रसिद्ध होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी दिली.
तळवडे आणि कोहिंडे बुद्रुक ही खेड तालुक्यातील दोन गावे उंच पठारावर आहेत. भामा आसखेड आणि चासकमान ही दोन्ही धरणे या गावापासून खूप दूर असल्याने इथे पिण्याचे पाणी आणि शेतीच्या पाण्याची नेहमीच टंचाई असते.
दोन्ही गावांना अनेक वेळा पाणी योजना करूनही बारमाही पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही कारण ऐन उन्हाळ्यात चार महिने पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींना पाणी राहत नाही. या उन्हाळ्यातही या दोन्ही गावांना टँकरने पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे काम शासनाला करावे लागले होते. आता भामा आसखेड धरण जलाशयातून पाणी पुरवठा केला जाणार असल्यामुळे या गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES