भामा-भीमा, सातगाव पठार परिसरातील शेतात राबणारे हात आत्मनिर्भरतेकडे !
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून शेतकरी कंपनीकडून खेड, आंबेगाव तालुक्यातील महिलांच्या पंखांना बळ
www.sahyadrilive.in
खेड (कडूस) : महिला सक्षमीकरण आणि शेतात राबणा-या हातांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी जर्मन सरकारच्या सहकार्याने भामा-भिमा फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड व सातगाव फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड या शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून एक पाऊल टाकले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कंपनीकडून भागधारक महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे या सन्मानासाठी मॅक्सीको, जर्मनीच्या पाहुण्यांनी हजेरी लावली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आयसीटी व जीआयझेड बँग्लोर कृषीशास्त्राच्या तांत्रिक तज्ज्ञ रेजिना, ॲपल व्हॅल्यू चेन प्रोजेक्टच्या (जीआयझेड) तांत्रिक तज्ज्ञ सुहासिनी, बँग्लोरच्या निरीक्षण आणि मूल्याकन मुख्य अधिकारी मर्लिन, जीआयसी आणि जीआयझेड पुणे विभागाचे तांत्रिक तज्ज्ञ अजित भोर, नारायणगाव टोमॅटो प्रकल्पाचे निरीक्षण आणि मूल्याकन अधिकारी हर्षा नाईक, बटाटा प्रकल्पाचे खेड तालुक्याचे मुख्य समन्वयक अतुल डेरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्येष्ठ महिला शेतकरी पपाबाई पंढरीनाथ राळे यांची निवड करण्यात आली.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे सुरुवात झाली. भावडी येथील सावित्रीकन्या कृषी विकास गटाने प्रार्थना गीत सादर केले. तसेच किवळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी शेतकरी समूह नृत्य सादर केले. कुरकुंडी येथील मुकाईदेवी महिला कृषी विकास गट आणि दस्तुरवाडी येथील वीरबाबा कृषी महिला विकास गटाने समूह नृत्याने वाहवा मिळविली. दत्तुरवाडी (सातगाव पठार) उर्मिला थोरात, कुरकुंडीच्या सुनीता पाचारणे यांनी मनोगत केले. जीआयसी बटाटा प्रकल्पातील कष्टकरी महिलांच्या आयुष्यावर चित्रफित दाखविण्यात आली.
सातगाव फार्मर कंपनीचे सभासद, भामा भीमा फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे सभासद व बिगर शेतकरी सभासद अशा ती संघांत प्रश्नमंजूषा घेण्यात आली. तीन टप्प्यांत झालेल्या या स्पर्धेत बिगर शेतकरी सभासदांनी अंतिम फेरीत सर्वाधिक गुण मिळवून विजेतेपद पटाकवले. विजेत्या संघात मानवधिकार महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ कंद यांचा सहभाग होता. प्रश्नमंजूषा स्पर्धेचे निवेदक म्हणून संगीता पाटील आणि सुनील साळुंके यांनी केले.
दरम्यान, प्रकल्प गावातील महिला व पुरूष शेतक-यांसाठी विविध उपक्रम, उत्पादनासह प्रदर्शन स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये काळा गहू, तांदूळ, निलकंठ बटाटा, केळी आणि बटाट्यापासून बनविलेले व्हेपर्स, स्ट्रॉबेरी, इंद्रायणी तांदूळ, ज्वारी, जैविक औषधे, भामा-भीमा फार्मर कंपनीचे स्टॉलवर सोयाबीन खरेदी, फिनोलेक्स कंपनीचे ठिबक व तुषार सिंचन विक्री, खत-औषधे, पारंपारिक वाण याशिवाय कंपनीच्या विविध योजनांची माहितीपर सात स्टॉल लावण्यात आले होते.
कार्यक्रमाचे संयोजन भामा भीमा शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अनिल कदम, उपाध्यक्ष सुखदेव गारगोटे, सचिव सुनील साळुंके, महिला संचालिका सुनीता पाचारणे, संचालक अर्जुन राळे, दत्तात्रय डांगले, बाबाजी कंद, प्रदीप कंद, बबन गोपाळे, संतोष बोंबले, ग्रीन एनोव्हेशन सेंटर फाॅर ॲग्रीकल्चर ॲण्ड फूड सेक्टर(जीआयसी) बटाटा प्रकल्प (महाराष्ट्र) अधिकारी संगीत पाटील, अतुल डेरे, विनोद ढेरंगे, शुभम बो-हाडे, प्रशांत डोके यांनी केले.
सूत्रसंचालन भास्कर शिवले यांनी केले. अतुल डेरे यांनी आभार मानले.
धान्यांची रांगोळी ठरली ‘लक्ष्यवेधी’
समन्वयक संगीता पाटील यांच्या संकल्पनेतून अतुल डेरे आणि सुनील साळुंके यांनी कार्यक्रमस्थळी धान्यांची आकर्षक रांगोळी साकारली. यामध्ये सोयाबीन, तांदूळ, मसूर डाळ, मूग, गहू, ज्वारी, काळा तांदूळ, हरभरा डाळ, हुलगे याशिवाय निलकंठ बटाटा आणि अंजिर तसेच धान्यांच्या रांगोळीला फुलांचाही साज होता. यामध्ये एकूण ७० किलो धान्य वापरले गेले, अशी माहिती कंपनीच्या संयोजकांनी दिली.
महिलांच्या कष्टाशिवाय शेती अपूर्ण – मर्लिन
शेतक-यांच्या शेतात राबणा-या महिलांसाठी हा कार्यक्रम आहे, याबाबत मला समाधान वाटले. पिकाच्या निर्मितीपासून बाजारात पाठविण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर महिलांची भूमिका निर्णायक राहते. महिला घराबरोबर शेतातही राबते म्हणून महिलांचे योगदान मोठे आहे. महिला दिन हा दररोजच साजरा केला पाहिजे. कंपनीत पुरूषांबरोबर महिलाही तितक्याच भागधारक आहे. कारण महिला आणि पुरूष एकसमान आहे. शेतात महिलांच्या कष्टाशिवाय शेती अपूर्ण म्हणावी लागेल असे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मर्लिन यांनी मनोगतात नमूद केले.