ज. मो. अभ्यंकरांचे ‘भरारी’ आत्मचरित्र प्रेरणादायी – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई
मुंबई : शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना सामाजिक भान ठेवून वंचित घटकांसाठी विशेष कार्य करणाऱ्या ज. मो. अभ्यंकरांचे ‘भरारी’ हे आत्मचरित्र सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी काढले. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांच्या ‘भरारी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री देसाई यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार विनायक राऊत, मुख्य माहिती आयुक्त सुमित मल्लीक, प्रकाशक अशोक कोठावळे, सतीश त्रिपाठी आदी उपस्थित होते. मंत्री देसाई पुढे म्हणाले, अभ्यंकरांच्या आत्मचरित्रातून त्यांच्या सहवासात आलेल्या विविध व्यक्तिमत्त्वाचा जवळून परिचय घडतो. शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी केलेला संघर्ष याद्वारे दिसतो.
शिक्षण हेच ध्येय ठेऊन अभ्यंकरांनी विविध योजना, उपक्रम राबविले. बालकामगार प्रथेतून मुलांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. या सर्व कार्याचा परिचय त्यांच्या भरारी पुस्तकातून घडतो. शिक्षण क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हे आत्मचरित्र निश्चितच प्रेरणा देणारे ठरेल असेही ते म्हणाले.
खासदार विनायक राऊत यांनी अभ्यंकर यांचा उल्लेख ‘शिक्षण क्षेत्रातील सुवर्णमणी’ असा केला. शिक्षणाशी संबधित सर्व शासन निर्णय अभ्यंकरांना मुखोद्गत असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रातील चालता बोलता विश्वकोष असे विशेषण राऊत यांनी अभ्यंकरांना बहाल केले.
मुख्य माहिती आयुक्त सुमीत मल्लिक यांनी अभ्यंकरांच्या आत्मचरित्राची आपण वाट बघत होतो असे सांगून ते अविरत कार्यरत राहावेत आणि त्यांच्या कार्याचे असे अनेक खंड या पुढे प्रकाशित व्हावेत, अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
भरारी या आत्मचरित्राचे प्रकाशन मॅजेस्टिक प्रकाशन या संस्थेतर्फे करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी मॅजेस्टिकचे अशोक कोठावळे यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती अपवादानेच आत्मचरित्र लिहितात या पार्श्वभूमीवर भरारीचे वेगळेपण अधोरेखित होते असेही त्यांनी सांगितले.