नायगाव येथे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अभिवादन
सातारा : फक्त नायगावमध्येच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना मर्यादित न ठेवता देशभरात आणि जगभरात त्यांचे विचार व कार्य पोहचविले पाहिजे.सावित्रीबाईंचे जन्मगाव असलेल्या नायगावचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने नायगाव जि. सातारा येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,पंकज भुजबळ, प्रा. हरी नरके, बापूसाहेब भुजबळ, महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे, पंचायत समिती सभापती अश्विनी पवार, सरपंच पुनम नेवसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भुजबळ म्हणाले, ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्ञान संकुल नायगाव येथे महाज्योती या संस्थेच्या माध्यमातून देशातील पहिली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संरक्षण अॅकॅडमी स्थापन करून याठिकाणी एनडीए व स्पर्धा पूर्व परिक्षा निवासी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी येथील ग्रामस्थांची मदत देखील शासनास अतिशय उपयुक्त असणार आहे. या प्रशिक्षण संकुलासाठी व विविध बाबींचा विकास करण्यासाठी शासनाकडे 50 कोटी रुपयांचा आराखडा पाठविण्यात आलेला आहे.
यामाध्यमातून नायगाव येथे निवासी प्रशिक्षण संस्था, निवासी शाळा व अन्य बाबींचा विकास महाज्योती संस्थेच्या माध्यमातून करण्यासोबत नायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही सुद्धा आंतरराष्ट्रीय स्वरूपाची अद्ययावत अशा प्रकारची शाळा महाज्योती संस्थेच्या वतीने विकसित करण्यात येईल. तसेच नायगावचा विकास करणे व नायगाव येथे अद्यावयावत ज्ञानसंकुल उभे करण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याचे, त्यांना समान हक्क मिळवून देण्याचे काम महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले. त्याचे आभार मानण्यासाठी आपण या भूमीला वंदन करतो. या दाम्पत्याने सर्वांना समान हक्क मिळविण्यासाठी आयुष्य वेचले असल्याचेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायगावच्या सरपंच पूनम नेवसे यांनी केले.