कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा
मुंबई : कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडून आता त्यांना शासकीय सेवेची दारे बंद होतील की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहानुभूतीपूर्वक यावर विचार करून अशी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने आज काढला आहे.
या शासन निर्णयात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात १ मार्च २०२० पासून जाहिराती प्रसिद्ध न झाल्यामुळे शासनाने संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा, दि. ०१ मार्च, २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत, ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे, अशा उमेदवारांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दि.३१ डिसेंबर २०२२ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात ज्या जाहिराती प्रसिद्ध होतील, त्या जाहिरांतीसाठी “एक वेळची विशेष बाब” म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक, या शासन निर्णयाच्या दिनांकानंतरचा असेल, अशा प्रकरणी देखील ०१ मार्च, २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन दि. २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे. अशा उमेदवारांसाठी देखील “एक वेळची विशेष बाब” म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी उलटून गेला आहे. मात्र प्रत्यक्षात परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले नाही, अशा प्रकरणी देखील दि. ०१ मार्च, २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन दि. २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे. अशा उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्यास्तव महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा संबंधित निवड समितीने “एक वेळची विशेष बाब” म्हणून परवानगी द्यावी. जेणेकरून त्यांना देखील परीक्षेस बसण्याची संधी प्राप्त होईल.