शहीद क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकासाठी शासन प्रयत्न करेल -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
राजगुरुनगर | सह्याद्री लाइव्ह। देशासाठी शहीद झालेल्या क्रांतिकारकांचा देशाला अभिमान आहे. क्रांतिकारकांचे कार्य देशासाठी प्रेरणास्त्रोत आहे. त्यामुळे राजगुरु यांच्या स्मारकासाठी शासन प्रयत्न करेल असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या ११४ व्या जयंती दिनी बुधवारी (दि. २४) राज्यपाल त्यांना अभिवादन करण्यासाठी खेडमध्ये आले. देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना शहीदांच्या जन्मभूमीत या विशेष कार्यक्रमाचे आयोजन खेड तालुका भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समितीच्या पुढाकाराने राजगुरुप्रेमी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लोकवर्गणीतून हा कार्यक्रम आयोजित केला होता.
राज्यपाल म्हणाले, भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना विसरून चालणार नाही. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. हुतात्म्यांच्या देशभक्तीचा जागर झाला पाहिजे. त्यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबत देशसेवेसाठी नागरिकाने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
देश विकासाच्या मार्गावर पुढे जात असताना या प्रक्रीयेला गती देताना देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिविरांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे. देशाला पुढे जाण्यासाठी आपल्या सर्वाचे प्रयत्न महत्वपूर्ण ठरतील. माझे नाही तर देशाचे आहे, असा राष्ट्रभाव जागृत ठेवण्यासाठी आपण शपथ घेतली पाहिजे. त्यामुळे नवीन पिढीत राष्ट्रप्रेम वाढीस लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, देशासाठी क्रांतिकारकांच्या बलिदानाची आपल्याला जाणीव ठेवावी लागेल. ‘राष्ट्र प्रथम’ हा संस्कार रुजवावा लागणार आहे. शाळकरी मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत क्रांतिकारकांचा इतिहास सांगावा लागेल.आमदार मोहिते यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. हुतात्मा स्मारकाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
राज्यपाल यांनी बस स्थानकातील स्मृतीशिल्प व राजगुरुवाडा येथे जाऊन अभिवादन केले. स्वर्गीय खासदार बाळ आपटे यांच्या निवासस्थानी ते त्यांनी भेट दिली. त्यानंतर चांडोली येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात हुतात्मा राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू, हुतात्मा सुखदेव यांचे वंशज अनुज थापर, हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे वंशज रवींद्र पिंगळे, हुतात्मा भगतसिंग यांचे वंशज किरणजीत सिंग, हुतात्मा बाबू गेनू यांचे वंशज किसन सैद यांचा विशेष गौरव करण्यात आला.
याप्रसंगी सर्व शासकीय खातेप्रमुख, योगेश गावडे, एक क्षण हुतात्म्यांसाठी समिती, हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन, हुतात्मा राजगुरु क्रांती संघ, शहीद भगतसिंह सुखदेव राजगुरु न्यास, हुतात्मा राजगुरु स्मारक समिती, हुतात्मा राजगुरु फाऊंडेशन, क्रांतीवीर शिवराम हरी राजगुरु मेमोरियल ट्रस्ट, हुतात्मा राजगुरु प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्यासह शहरातील सर्व ज्ञातीसंस्था, शैक्षणिक, सामाजिक, अध्यात्मिक संस्था व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
ऍड. निलेश आंधळे, मधुकर गिलबिले, अमर टाटिया, ऍड. मनिषा पवळे, बाळासाहेब सांडभोर, आनंद गावडे, किशोर कुमठेकर, पंकज नाईकरे, बाबाजी शिंदे, विठ्ठल पाचारणे, अजिंक्य बकरे, सुभाष रणपिसे, प्रभाकर जाधव आदींनी याचे नियोजन केले.
शहरातील राजगुरुप्रेमींनी एकत्र येऊन मागील २४ ऑगस्ट पासून ‘एक क्षण हुतात्म्यांसाठी’ ही अभिनव संकल्पना राबविली. खेड तालुक्यात राजगुरुंच्या नावाने कार्यरत असणाऱ्या सुमारे २५ संस्थांना एकत्र आणून त्यांच्या माध्यमातून वर्षभर अनेक उपक्रम राबविण्यात आले. याची सांगता या कार्यक्रमाने झाली.
यावेळी खेड पंचायत समिती निर्मित नमन हुतात्मा राजगुरु ही चित्रफीत दाखविण्यात आली. सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले तर मधुकर गिलबिले यांनी आभार मानले.