राज्यपालांकडून विद्यापीठांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना व स्टार्टअप्सचा आढावा
मुंबई : राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील 11 पारंपरिक विद्यापीठांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा तसेच त्या माध्यमातून सुरु झालेल्या स्टार्टअपचा एका बैठकीत विस्तृत आढावा घेतला. मुंबई, पुणे, नागपूर येथील विद्यापीठांमधील इनोव्हेशन, इन्क्युबेशन व लिंकेजेस विभागांच्या संचालकांसोबत शुक्रवारी राजभवन येथे झालेल्या बैठकीत राज्यपालांनी हा आढावा घेतला. विद्यापीठांनी नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप्स व उद्योजकतेला चालना देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढविण्यासाठी केलेल्या कार्याचा राज्यपालांनी यावेळी विद्यापीठनिहाय आढावा घेतला.
विद्यार्थ्यांनी केवळ रोजगार मागणारे उमेदवार न होता रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हावे असे मत व्यक्त करून राज्यपालांनी प्रत्येक विद्यापीठांच्या यशोगाथा वाढावयास पाहिजे असे मत व्यक्त केले. विद्यापीठांनी इन्क्युबेशन केंद्रातून काय सुविधा दिल्या, विद्यापीठांमधून किती पेटंट्स मिळाले तसेच विद्यापीठांच्या नवसंकल्पनांना किती बीज भांडवल मिळाले याची देखील राज्यपालांनी चौकशी केली. यावेळी राज्यपालांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व इतर विद्यापीठांच्या कार्याचे कौतुक केले तसेच विद्यापीठांनी परस्परांकडून शिकावे अशी अपेक्षा व्यक्त केली.