आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते मानद डी.लिट पदवी प्रदान
मुंबई : आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (25 मार्च) राजभवन मुंबई येथे एका विशेष दीक्षांत समारंभात मानद डी.लिट ही पदवी प्रदान करण्यात आली. राजस्थानच्या झुनुझुनु येथील श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे प्रा. जगदीश मुखी यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ योगदानाबद्दल ही मानद पदवी समारंभपूर्वक देण्यात आली.जगदीश मुखी यांचे सार्वजनिक जीवनातील योगदान फार मोठे आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ देशाला मिळावा अशी अपेक्षा राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली. जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाने राजस्थानच्या ग्रामीण भागात महिला शिक्षणासाठी चांगले काम केल्याबद्दल मुखी यांनी संस्थेचा गौरव केला.
यावेळी जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विनोद टिब्रेवाला व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यापीठाचे व्यवस्थापन करणाऱ्या राजस्थान सेवा संस्थेच्या शिक्षण संचालिका वनश्री वालेचा यांनी मुखी यांच्या मानपत्राचे वाचन केले.जगदीश मुखी यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांनी दिल्ली सरकारमध्ये मंत्री पद भुषविले होते. त्यांना तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘देशातील सर्वोत्तम वित्त मंत्री’ हा पुरस्कार देण्यात आला होता. सन 1980 पासून जगदीश मुखी यांनी दिल्लीतील जनकपुरी येथून सलग सात वेळा विधानसभा निवडणूक जिंकली. आसामचे राज्यपाल होण्यापूर्वी ते अंदमान निकोबारचे नायब राज्यपाल होते.