२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची मानवंदना
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहिद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील वीरांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानवंदना दिली. तसेच त्यांच्या स्मृतीस्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सर्व मान्यवरांनी तसेच गणवेशातील अधिकारी व पोलीस जवानांनी हुतात्म्यांना सलामी दिली.
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणातील शहीद स्मारक येथे आयोजित अभिवादन संचलन कार्यक्रमास मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहीद कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
या सर्वं उपस्थितांनीही पुष्प अर्पण करून शहिदांना अभिवादन केले.सर्व मान्यवरांनी उपस्थित शहिदांच्या कुटुंबियांची भेट घेऊन शहीद पोलिसांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त केली.