सौरउर्जेला प्राधान्य देत शेतक-यांना दिवसा विज देण्याचा सरकारचा संकल्प
उस्मानाबाद । सह्याद्री लाइव्ह । राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी आवश्यक जमीन तत्काळ अधिग्रहित करण्यात येणार आहे.
‘मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना’ राज्यस्तरावर हे काम करणार आहे. या संपुर्ण कामाची निविदा काढण्यात येणार असून या कामातून चार ते पाच हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे टार्गेट ठेवले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहीती दिली.
सहकार मंत्री अतुल सावे, आमदार सुरेश धस, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार राजा राऊत, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
राज्यशासनाचा हा दूरदृष्टी सौरप्रकल्प आहे. या सौरप्रकल्पात शासकिय जमिनींबरोबरच खासगी जमिनीवर हा महत्वपूर्ण सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. ‘मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी ’ या योजनेअंतर्गत हे प्रकल्प तयार होणार आहेत. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होण्यासाठी ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाच्या कामाला महावितरण आणि जिल्हा प्रशासनाने प्रथम प्राधान्य द्यावे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सध्या अलनिनो वादळामुळे पावसाळा लांबणीवर गेला असल्याने पावसाच्या कमतरतेचा सिंचनाच्या सुविधेवर परिणाम होऊ नये यासाठी या काळात जलयुक्त शिवार योजनेची जास्तीत जास्त कामे पूर्ण करायला हवीत. तसेच योजनेसाठी निवड झालेल्या सर्व गावांमध्ये तातडीने कामे सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.