मौजे चेंढरे (पिंपळभाट) येथील शासकीय जागा जिल्हा माहिती कार्यालयास हस्तांतरित
अलिबाग : जिल्ह्यातील मौजे चेंढरे (पिंपळभाट) ता. अलिबाग येथील जमीन रायगड जिल्हा माहिती कार्यालयास प्रदान करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुसज्ज माहिती भवन उभारण्याच्या प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याचे समाधान राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय कामकाजाच्या जिल्ह्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींशी इतर प्रशासकीय कार्यालयांशी, प्रसारमाध्यमांशी, विविध क्षेत्रातील मान्यवरांशी येणारा नियमित संपर्क पहाता या कार्यालयाची अद्ययावत स्वतंत्र इमारत जिल्हा माहिती भवनाच्या रुपात असणे गरजेचे असून, अलिबाग शहरात अगर शहरालगत विनामूल्य जागा उपलब्ध करून मिळण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे विनंती केली होती. तसेच संचालक (माहिती) प्रशासन) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई यांनीही जिल्हा माहिती कार्यालय, रायगड अलिबाग करिता प्रस्तावित असलेल्या जिल्हा माहिती भवनाच्या इमारत बांधकामासाठी पिंपळभाट येथे 15 गुंठे शासकीय जागा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती केली होती.
त्यानुषंगाने उपविभागीय अधिकारी,अलिबाग यांच्या अहवालान्वये जिल्हा माहिती भवन उभारण्याकरीता मौजे चेंढरे, ता. अलिबाग येथील ग.नं. 128/15, क्षेत्र 0.67.00 हे. आर. मागणी क्षेत्र 0.15.0 हेक्टर आर महाराष्ट्र शासन सरकारी बिनआकारी पड, सार्वजनिक रस्ता जाण्यायेण्याचा 6 मिटरचा रस्ता अशी नोंद दाखल करण्यात आली.
तसेच मुख्यालयाचे बळकटीकरण व विभागीय/जिल्हा माहिती कार्यालयीन इमारत बांधकाम या योजनेकरिता 09 फेब्रुवारी 2022 रोजी मंत्रालय,मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावास महाराष्ट्र मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली असून या योजनेंतर्गत जिल्हा माहिती भवन उभारण्याकरीता मौजे चेंढरे, ता.अलिबाग, जि. रायगड येथील स.नं. 128/15, क्षेत्र 0.67.0 हे. आर पैकी क्षेत्र 0.15.0 हे. आर जमीन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 40 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (शासकीय जमिनीची विल्हेवाट करणे) नियम 1971 मधील नियम क्र. 5 व 6 (3) मधील तरतुदीनुसार भोगवटादार वर्ग-2 या धारणाधिकाराने जिल्हा माहिती भवन इमारतीकरीता जिल्हा माहिती अधिकारी, रायगड यांना भोगाधिकार मूल्यरहित व जमीन महसूलमुक्त व कब्जे हक्काने हस्तांतरीत केल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जारी केले.
रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी संवादाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना आणि संकल्पना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यास हे नियोजित जिल्हा माहिती भवन मोलाची भूमिका बजावणार आहे. अलिबाग चेंढरे (पिंपळभाट) येथील 15 गुंठे शासकीय जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या या अद्ययावत माहिती भवनामध्ये मिनी थिएटर, मिनी स्टुडिओ, माहिती व तंत्रज्ञान कक्ष, प्रदर्शन दालन, विविधोपयोगी सभागृह, डिजिटल वाचनालय, मीडिया संनियंत्रण कक्ष, प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरीता अद्ययावत प्रसारमाध्यम कक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र आदी व्यवस्था असणार आहे.
पर्यटन व औद्योगिकदृष्ट्या संपन्न अशा रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, कोकण रेल्वे, सागरी वाहतूक या माध्यमातून येणारे पर्यटक आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यातील बहुतांश जनतेचे शेती आणि मासेमारी हे प्रमुख व्यवसाय असून ग्रामीण, डोंगराळ आणि दुर्गम भागात वास्तव्यास आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती ही शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी हे माहिती भवन मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास पालकमंत्री तटकरे यांनी व्यक्त केला.
जिल्हा माहिती भवनाच्या निर्मितीसाठी अत्यंत मोलाची भूमिका व गतिमान कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून होत आहे. त्यासाठी पालकमंत्री तटकरे यांनी समाधान व्यक्त केले आहे.