आनंदाची बातमी! कडूस गावचा पाझर तलावही शंभर टक्के भरला
कडूस (ता. खेड) । सह्याद्री लाइव्ह । खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विशेषत: कुंडेश्वर डोंगर परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कडूस गावातील पाझर तलाव १०० टक्के भरला आहे. २.६२ दशलक्ष घनमीटर क्षमता असलेला हा तलाव मंगळवारी (दि. १) सायंकाळी पाचच्या दरम्यान भरून तलावाच्या सांडव्यावरून कुमंडला नदीत विसर्ग सुरू झाला.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कडूस, गारगोटवाडी परिसरातील हजारो हेक्टर शेतजमिनीसह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून, शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. गेल्या वर्षी १३ जुलै राजी हा तलाव संपुर्ण भरला होता. यावर्षी पावसाचे आगमन उशीरा झाल्यामुळे तलाव तब्बल १९ दिवस उशीरा भरला आहे.
कोहिंडे बुद्रुक, रौंधळवाडी, कंदवाडी, बंधा-याचे संपूर्ण पाणी कडूसच्या या पाझर तलावाला मिळते. पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासात ३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सुरू असलेल्या कमी जास्त पावसाने तलावात पाण्याची आवक कमी जास्त होत आहे. तलावाच्या सांडव्यांवरून पाणी पडत असल्यामुळे कुमंडला नदी प्रवाहित झाली आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES