आनंदवार्ता । भामा-आसखेड प्रकल्पबाधितांसाठी आनंदाची बातमी; जमीनींचे ‘पुनर्वसनासाठी राखीव’ शेरे उठवणार
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । राज्य सरकारने भामा-आसखेड प्रकल्पबाधितांसाठीच्या राखीव जमिनींवरील ‘पुनर्वसनासाठी राखीव’ शेरे उठवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, हवेली आणि दौंड तालुक्यातील प्रस्तावित लाभ क्षेत्रातील जमिनींवरील शेरे उठवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या चार ते पाच दिवसात शासन निर्णय काढला जाणार असल्याचे सांगितले.
तसेच ‘एसईझेड’ साठी राखीव जमीनींवरील शिक्केही काढण्यात आले असून लवकरच शेतक-यांना अद्ययावत सातबारा उता-यांचे वाटप करण्यात येईल, अशी माहीती शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
आढळराव पाटील म्हणाले की, खेड तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील युती शासनाने भामा-आसखेड व सेझचे प्रलंबित विषय प्राधान्याने सोडवून आनंदाचे डबल गिफ्ट दिले आहे.
या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या या दोन्ही महत्त्वाच्या प्रश्नांवर गेली अनेक वर्षे आपण शेतकऱ्यांसोबत लढा दिला. अनेक शेतकरी व शिवसैनिकांवर या विरोधातील आंदोलनातून गुन्हे दाखल झाले. भविष्यात शेतकऱ्यांवरील हे गुन्हे मागे घेण्यासाठी माझा शासनाकडे आग्रही पाठपुरावा राहणार आहे.
भामा आसखेड प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीवरील राखीव शिक्के शासनाने उठवावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता. गेली वीस वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न केवळ सहा-सात महिन्यात सुटल्याने मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीची व शेतकऱ्यांप्रति असलेल्या प्रेमाची चुणूक दिसून येते. लवकरच बाधित शेतकऱ्यांच्या कोऱ्या झालेल्या सातबारांचे वाटप संबंधित शेतकऱ्यांना करून त्यांच्या आनंदात सहभागी होणार असल्याचे यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.
या निर्णयामुळे भामा-आसखेड लाभक्षेत्रबाधित खेड तालुक्यातील काळूस, वाकी खुर्द, आसखेड खुर्द, रोहकल, कोरेगाव, करंजविहीरे, शेलू, आंबेठाण, पिंपरी खुर्द, चाकण, बिरदवडी, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, रासे, भोसे, शेलगाव, खराबवाडी, गोनवडी व नानेकरवाडी या गावांतील ९०८८ हेक्टर शेतजमिनींवरील पुनर्वसनासाठी राखीव शेरे उठविले जाणार आहेत. खेड एसईझेड टप्पा दोन मधील पूर, चौधरवाडी, गोसासी, वाफगाव, पाबळ, रेडवडी, वरूडे या गावांतील २५७९ हेक्टर क्षेत्रावरील संपादनासाठी राखीव असल्याचे शिक्के काढण्यात आले असल्याची माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.