महावितरण कर्मचा-यांसाठी गूड न्यूज : कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महावितरणमधील जे कर्मचारी १ सप्टेंबर २०१४ रोजी कर्मचारी निवृत्ती वेतन योजना – १९९५ या योजनेचे सदस्य आहेत. तसेच या योजने अंतर्गत निवृत्ती वेतन प्रत्यक्ष वेतनावर घेण्यासाठी इच्छूक आहेत, अशा कर्मचाऱ्यांनी आपला अर्ज संबंधित कार्यालयांमध्ये जमा करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.
कर्मचाऱ्यांनी सादर केलेले संयुक्त पर्यायी अर्ज सध्या कार्यरत असलेल्या कार्यालयाच्या ठिकाणी अथवा सेवानिवृत्त झालेल्या कार्यालयाकडे २७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
कर्मचाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर, प्रत्यक्ष वेतनावरील कंपनीचा ८.३३ टक्के वाटा विहित व्याजासह कर्मचारी भविष्य निर्वाह निधी पेन्शन फंडात म. रा. वि. मंडळ, भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळाद्वारे जमा करण्यात येणार आहे. ज्या माजी कर्मचाऱ्यांची अंतिम भविष्य निर्वाह निधीची पूर्ण रक्कम अद्यापही म. रा. वि. मंडळ, भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळाकडे जमा असेल, अशा माजी कर्मचाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर ती रक्कम म. रा. वि. मंडळ, भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळामार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
सन १९९५ पासून सर्व कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधी बाबतची सर्व माहिती सचिव, म. रा. वि. मंडळ, भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळ या विभागाकडून त्यांच्या पोर्टलवर ( https://cpf1.mahadiscom.in/CpfWebProject/ ) CPF HR Report मध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने १ सप्टेंबर २०१४ पूर्वी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वेतनासंबंधीचा पर्याय निवड करण्याकरिता संयुक्त पर्यायी नमुना अर्ज त्यांचे portal ( https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/member Interface Pohw/ ) वर जाहीर केलेला आहे.
महावितरण कंपनीमधील भविष्य निर्वाह निधी अधिनियमानुसार निवृत्ती वेतनास पात्र असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत माहिती, नव्याने लागू होणाऱ्या निवृत्ती वेतन संदर्भात माहिती, संबंधित कर्मचाऱ्यास निवृत्ती वेतन योजनेकरिता भरावी लागणारी अंदाजित रक्कम आणि नव्याने लागू होणारी निवृत्ती वेतनाची अंदाजित रक्कम आदी बाबतची माहिती सीपीएफ पोर्टलवर उपलब्ध आहे.
१ सप्टेंबर २०१४ पूर्वी रूजू झालेले व सद्यस्थितीत कार्यरत कर्मचारी तसेच १ सप्टेंबर २०१४ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त पर्यायी अर्ज २७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत संबंधित महावितरणच्या संबंधित मानव संसाधन विभाग प्रमुखाकडे सादर करावा लागेल. संयुक्त पर्याय अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पर्यायात बदल करता येणार नाही.