शेळी पालनातून मिळेल ग्रामीण अर्थकारणाला चालना – पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार
धुळे : शेळी पालन व्यवसायातून मांस आणि दुग्ध व्यवसाय शक्य आहे. शेतीला पूरक म्हणून शेळीपालन केल्यास ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळेल. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेळी पालनावर भर द्यावा, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले.
पशुसंवर्धन मंत्री केदार आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी मालपूर, ता. शिंदखेडा येथे भेट देवून शेळी पालकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी- मेंढी विकास प्रक्षेत्रच्या व्यवस्थापक डॉ. प्रियांका तोंड, पुणे येथील व्यवस्थाकीय संचालक शशांक कांबळे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय विसावे, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेंद्र लंघे, सामाजिक कार्यकर्ते श्यामकांत सनेर, माजी सरपंच हेमराज पाटील,सदाशिव गोसावी, प्रकाश पाटील, वीरेंद्र गोसावी आदी उपस्थित होते.
पशुसंवर्धन मंत्री केदार म्हणाले, शेळी- मेंढी पालन करणारा मेंढपाळ महत्वाचा घटक आहे. हा घटक कष्टकरी आहे. शेळी- मेंढीच्या माध्यमातून दुधाबरोबरच मांस उत्पादन मिळते. त्यामुळे ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळते. या भागात आढळून येणाऱ्या काठेवाडी किंवा झालावाडी या शेळीच्या जातीचा शेळी- मेंढी विकास महामंडळाने अभ्यास करून या जातीचे जतन आणि संवर्धनासाठी प्रयत्न करावेत. दूध उत्पादकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मालपूरसह परिसरात पशुधनाची संख्या मुबलक आहे. या पार्श्वभूमीवर पशुधनाच्या आरोग्य संवर्धनासाठी पशुसंवर्धन विभागाला मोबाईल क्लिनिक व्हॅन देण्याचे नियोजन करण्यात येईल. शेळी- मेंढी पालकांनी पशुधनाचा विमा काढून घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.
यावेळी पशुसंवर्धन मंत्री केदार यांनी शेळी- मेंढी पालकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच त्यांनी घोंगडी व्यावसायिकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. हेमराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जयवंत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.