महादेवाची विविध रूपे असलेली घारापुरी, एलिफंटा लेणी भाविकांसाठी सोमवारी खुली ठेवा
खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय पर्यटन मंत्र्यांकडे मागणी
मावळ : मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण घारापुरी बेटावरील महादेवाची विविध रूपे असलेली अतिप्राचीन लेणी पुरातत्त्व विभागाकडून दुरुस्ती, देखभालीसाठी आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी बंद ठेवली जाते. सोमवार हा भगवान शिवाची उपासना करण्याचा सर्वात शुभ दिवस मानला जातो. नेमके त्याचदिवशी मंदिर बंद ठेवले जात असल्याने हजारो देशी-विदेशी पर्यटक, भाविकांना शिवदर्शनाला मुकावे लागत आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यासाठी मंदिर सोमवारी उघडे ठेवावे.
सोमवार सोडून इतर कोणत्याही दिवशी देखभालीसाठी बंद ठेवावे, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. याबाबत केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, घारापुरी बेटावर कलचुरी घराण्याच्या कारकिर्दीत कोरण्यात आलेली अतिप्राचीन कोरीव लेणी आहेत. काळ्या पाषाणात योगेश्वर शिव, रावणानुग्रहमूर्ती, शिवपार्वती, अर्धनारीनटेश्वर, गंगावतरण शिव, शिवपार्वती विवाह, अंधकारसुरवधमूर्ती, नटराज शिव आणि महेशमूर्ती अशी शिवाची विविध रूपे या कोरीव शिल्पात अद्भुतरीत्या कोरलेली आहेत
कोरीव शिल्पांबरोबरच लेणी परिसरातील विविध गाभा-यांत अतिप्राचीन चार शिवलिंग आहेत. त्यापैकी लेणींच्या पश्चिमेलाही पूर्वाभिमुख शिवमंदिर सुमारे 20 चौ. मी. छतापर्यंत भिडलेले आहे. शिवमंदिराला चारही दिशांना दारे आहेत. या चारही दारांवर विशाल द्वारपाल तैनात आहेत. मंदिरात चौकोनी शाळुंका असून, अगदी तिच्या मधोमध विशाल लेणींचे मुख्य आकर्षण आहे. अशी ही शिवाची अद्भुत शिल्पे पाहण्यासाठी देश-विदेशी पर्यटकांची वर्षभर नेहमीच गर्दी असते. हजारो भाविक शिवाची पूजा करण्यासाठी येतात.
मात्र, वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा लाभलेल्या घारापुरी लेणी प्रत्येक सोमवारी देखभालीच्या कारणासाठी बंद ठेवली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या भागातील लोक सोमवारी मंदिर उघडण्याची मागणी करत आहेत. सोमवार हा भगवान शिवाची उपासना करण्याचा सर्वात शुभ दिवस मानला जातो. त्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाला मंदिर सोमवारी उघडे ठेवण्याच्या सूचना द्याव्यात. जेणेकरून यात्रेकरूंना सर्वात शुभ दिवशी त्यांची प्रार्थना करता येईल. सोमवार सोडून इतर कोणत्याही दिवशी देखभालीसाठी बंद ठेवावे, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.