विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – राज्यमंत्री बच्चू कडू
अमरावती : विकासाच्या प्रक्रियेत विद्यालयांची भूमिका महत्त्वाची असते. शालेय जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. विद्यालयात विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याचा पाया रचला जातो. विद्यालयात शैक्षणिक दर्जा उंचावण्यात शिक्षकांचे अमूल्य योगदान असते. विद्यालयांमध्ये मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज दिली.
चांदुर बाजार येथील उर्दू विद्यालयात वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्राप्त 50 लक्ष रुपयांच्या निधीतुन विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. त्याप्रसंगी आयोजित भुमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उर्दू विद्यालयाचे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे, वाचनालय, खेळाचे मैदान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या मुलभूत सुविधांच्या निर्मितीसह सौंदर्यीकरणाला प्राधान्य देण्यात यावे. विद्यालयाच्या परिसरात हिरवळ राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात बांबूची झाडे लावण्यात यावी. या सर्व बाबींचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, चांदुर बाजारचे उपविभागीय अभियंता मिलिंद भेंडे, शाखा अभियंता शुभम आवारे आदी उपस्थित होते.
एकूण 48 कोटी 33 लक्ष निधीतुन विविध विकास कामांचे भुमिपूजन
चांदुर बाजार येथे विविध विकास कामांचे भुमिपूजन आज बच्चू भाऊ कडू यांनी केले. वैशिष्ठ्यपूर्ण निधी अंतर्गत नगर परिषदेच्या कक्षेत 8 कोटी 12 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त 1 कोटी 4 लक्ष रुपयांच्या निधीतून विविध प्रस्तावित कामांचे भुमिपूजन त्याचप्रमाणे तहसिल कार्यालयाच्या प्रशासकिय इमारतीचे बांधकाम, उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या पहिल्या माळ्याचे बांधकाम, रस्ता रुंदीकरणाचे काम व रस्ता चौपदरीकरणाचे काम व मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहाच्या बांधकामाचे भुमिपूजन असे 48 कोटी 33 लक्ष रुपयांच्या प्राप्त निधीतुन विकासकामांचे भुमिपूजन कडू यांनी आज केले.
1 कोटी 65 लक्ष निधीतून रस्त्यांची निर्मिती व विकास
ताजनगर येथील मुस्लीम शादीखाना रस्त्याचे 1 कोटी 20 लक्ष रुपये निधीतुन, आयटीआय महाविद्यालय ते डोंगरदिवे यांच्या घरापर्यंत 15 लक्ष रुपयांच्या निधीतुन रस्त्याचे काँक्रिटीकरण, 30 लक्ष रुपये निधीतुन ताज नगर येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण व नाल्याच्या दुरूस्तीच्या कामाचे भुमिपूजन आज कडू यांनी केले. यावेळी नगरसेवक सरदार खॉ शहादत खॉ, नगरसेविका वैशाली खोडपे, नगराध्यक्ष नितीन कोरडे आदी उपस्थित होते.
चांदूर बाजार नगर परिषद क्षेत्रात वाचनालय व व्यायामशाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन
जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त सुमारे 71 लक्ष रुपयांच्या निधीतून चांदूर बाजार येथील नगर परिषद क्षेत्रामध्ये वाचनालयाचे व व्यायामशाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन कडू यांनी आज केले. नूतन इमारतीची पाहणी त्यांनी यावेळी केली. वाचनालय व व्यायामशाळा लवकरात लवकर वापरासाठी उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच नविन इमारतींची देखभाल व इमारत सुस्थितीत ठेवण्यासाठी योग्य त्या बाबी वेळोवेळी करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. यावेळी मुख्याधिकारी राजेंद्र फातले, अभियंता मनिष शर्मा उपस्थित होते.
नागरिकांसाठी अत्यावश्यक मुलभूत सुविधा निर्मितीवर भर
नागरिकांसाठी मुलभूत सुविधांच्या निर्मितीमुळे विकासाची प्रक्रिया गतिमान होत असते. यासाठी रस्ते, पाणी या सुविधांसह रुग्णालये, महाविद्यालये सुसज्ज व अद्ययावत असणे अत्यावशक बाब आहे. असे प्रतिपादन कडू यांनी चांदुर बाजार येथील बेलोरा चौक बाजारात वाहनतळाची व्यवस्था व पोलीस स्टेशनच्या मागील चौकाचे सुशोभिकरण कामाच्या भुमिपूजन प्रसंगी केले. अंदाजे 73 लक्ष रुपयांच्या निधीतुन हे काम पूर्ण होणार असून नागरिकांसाठी अत्यावश्यक सुविधांची निर्मिती होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
बेलोरा चौकातील नजुलच्या जागेतील अतिक्रमण हटविण्यात यावे असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. त्याठिकाणी गाळयांची निर्मिती करण्यात यावी व त्यासंबंधिचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.