इटालीयन गुंतवणूकदारांसाठी राज्याकडून संपूर्ण सहकार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । इटली आणि भारताचे संबंध हे नेहमीच सौहार्दपूर्ण राहीले आहेत. गुंतवणूकदारांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्याकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
इंडो- इटालीयन औद्योगिक संबंधांची पाच दशके साजरे करण्यासाठी मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इटलीचे भारतातील राजदूत विंचेझो दे लुका, इंडो -इटालीयन चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष अमित रॉय, आजीवन सदस्य एन के नायर व इतर मान्यवर उपस्थित होते.
इटालीयन दुतावास आणि इंडो -इटालीयन चेंबर ऑफ कॉमर्स च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेली पंच्चावन वर्षे भारत आणि इटली देशात औद्योगिक देवाण- घेवाण होत आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. समृद्धी महामार्ग, ॲक्सेस कंट्रोल हायवे, जे एन पी ए बंदराचा विकास, लॉजिस्टिक सहकार्यासाठी फ्रेट रेल्वे यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. इटालीयन उद्योजकांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.
इंडो -इटालीयन चेंबर ऑफ कॉमर्समध्ये सुमारे सहाशे उद्योजक आहेत यापैकी तिनशे उद्योग हे महाराष्ट्रात असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. भारतात सुरू झालेल्या 80 हजार स्टार्ट अपपैकी 50 हजार स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत तर शंभर युनिकॉर्न कंपन्यांपैकी 25 कंपन्या महाराष्ट्रातून कार्यरत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
उत्पादन, पायाभूत सुविधा, पॅकेजिंग, कृषी उत्पादन या सारख्या अनेक क्षेत्रात इटालीयन उद्योजक आपला व्यवसाय करत असल्याचे इंडो- इटालीयन चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष अमीत रॉय यांनी सांगितले. आज सुमारे सहाशे उद्योगातून 50 हजाराहून अधिक रोजगार निर्मिती या माध्यमातून झालेली आहे.
इटलीचे भारतातील राजदूत विंचेझो दे लुका यांनी भारतातील आपला अनुभव समृद्ध करणारा असल्याचे सांगितले. गेल्या पाच दशकात केवळ औद्योगिकच नव्हे तर सांस्कृतिक देवाण – घेवाण वाढली असल्याचे ते म्हणाले. जागतिक स्तरावर उत्पादन क्षेत्रात भारतास उत्तम भविष्य आहे. तंत्रज्ञान, नाविन्यता, कल्पकता या सर्वस्तरावर सहकार्य करण्याची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील मुंबई आणि इटलीतील मिलान या शहरांदरम्यान सिटी टू सिटी रिलेशनशिप उपक्रम राबविण्यात यावा अशी कल्पना त्यांनी मांडली.
गेली कित्येक वर्ष इंडो – इटालीयन चेंबर सोबत जोडले गेलेले आजीवन सदस्य एन के नायर यांनी भारतातील इटालीयन उद्योगांच्या झालेल्या स्थित्यंतराचा आढावा घेतला. सुरूवातीला केवळ दहा सदस्य असलेली ही संस्था आज सहाशे सदस्य असलेली मोठी संस्था आहे. पूर्वी आयात परवाना मिळविण्यात प्रचंड अडचणी येत असत. खुल्या अर्थव्यस्थेनंतर समस्या कमी होत गेल्या. इटलीत “नमस्ते इंडीया” हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती आजीवन सदस्य एन के नायर यांनी दिली.