नव्या वर्षापासून कटींगसाठी मोजावे लागणार 250 रुपये
दाढीसाठी 100 ऐवजी किमान 125 रुपये न्यू सलून आणि पार्लर असोसिएशनचा निर्णय
पुणे : येत्या काळात हेअर कटींग आणि दाढीच्या दरात वाढ होणार आहे. 1 जानेवारी 2022 पासून साध्या कटींगसाठी 200 रुपयांऐवजी आता किमान 250 रुपये मोजावे लागणार आहेत. तर दाढीसाठी 100 ऐवजी किमान 125 रुपये आकारण्यात येणार आहे, असे न्यू सलून आणि पार्लर असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायांवर मोठा परिणाम झाला होता.
सलून व्यावसायिकांवरदेखील आर्थिक संकट ओढावले असून, व्यवसायात येणाऱ्या अतिरिक्त खर्चाच्या पार्श्वभूमीवर न्यू सलून पार्लर असोसिएशनने भाववाढ केली आहे. कुशल कारागिरांकडून कटींग करून घेण्यासाठी किमान भाव 300 रुपये असेल, तर दाढीसाठी किमान 150 रुपये आकारण्यात येणार आहेत. निमकुशल कारागिरांकडून कटींग करून घेण्यासाठी किमान दर 250 रुपये असणार असून, दाढीसाठी 125 रुपये आकारण्यात येणार आहेत.
याशिवाय मास्टर कारागिरांकडून हेअरकट करण्यासाठी सध्या 500 रुपयांपासून पुढे दर आकारण्यात येत आहे. येत्या काळात कलात्मकता आणि सोयीसुविधांच्या अनुषंगाने मास्टर सलून व्यावसायिक दर आकारू शकणार आहेत. तर हायजिन शेव्हींगसाठी 250 रुपये आणि बेअर्ड शेपिंग आणि ट्रिमिंगसाठी 300 रुपये आकारण्यात येणार आहेत, अशी माहिती असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.