माझ्यापासून “राजकीय धोका असू शकतो पण फिजीकल धोका असू शकत नाही”; भाजप पदाधिका-याच्या तक्रारीवर अजित पवारांची प्रतिक्रीया
पुणे । सह्याद्री लाइव्ह । भाजप पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अजित पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी या तक्रारीत म्हंटलं आहे. भाजप पदाधिकारी रवींद्र साळगावकर यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रीया देताना अजित पवार म्हणाले की, “कोणामुळे कोणाच्या जीवाला धोका असेल तर त्याला संरक्षण मिळालं पाहीजे. ज्यांनी तक्रार केली त्याला पोलिसांनी आणि सरकारने संरक्षण द्यावं. जर त्याच्यात गंभीरता असेल तर स्टेनगन सहित त्याला संरक्षण द्यावं”.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, “मी कायदा सुव्यवस्था, संविधान पाळणारा माणूस आहे. माझ्याकडून धोका असण्याचं काही कारण नाही. राजकीय धोका असू शकतो पण फिजीकल धोका असू शकत नाही” असेही अजित पवार म्हणाले.
गणेशखिंड रस्त्यावर ई स्क्वेअरच्या समोरील एका प्लॉटच्या मोजणीसंदर्भात माहिती घेत त्यांना विरोध करत असल्यामुळे अजित पवार यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याचं रवींद्र साळगावकर यांनी म्हंटलं आहे.
दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. मात्र साळगावकर यांनी त्यांच्या लेटरहेडवर लिहून दिलेली तक्रार पोलिसांनी स्वीकारली आहे.