राज्यात दुग्ध उत्पादनातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करणार – डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन
मुंबई । सह्याद्री लाइव्ह। डेन्मार्क हा जगातील आघाडीचा दुग्ध उत्पादक देश असून आपल्या देशाने भारताला दुग्ध क्रांती घडवून आणण्यात मदत केली आहे. डेन्मार्क भारतातील अनेक राज्यांना कृषी व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात सहकार्य करीत असून लवकरच महाराष्ट्रात दुग्ध उत्पादनातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करणार असल्याची माहिती डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन यांनी आज येथे दिली.
फ्रेडी स्वेन यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
स्वेन म्हणाले, जगातील सर्वात मोठी जहाज व लॉजिस्टिक कंपनी मर्स्क, लार्सन अँड टुब्रो यांसह ३० डॅनिश कंपनी भारतात कार्य करीत असून स्वच्छ ऊर्जा व कार्बन उत्सर्जन कमी करणे या कार्यात तांत्रिक सहकार्य करीत आहे. डेन्मार्क तामिळनाडूमध्ये ‘विंड पार्क’ स्थापन करीत असून भारतातील शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्याच्या दृष्टीने देखील सहकार्य करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोरोना संसर्गाच्या काळात भारताने डेन्मार्कसह अनेक देशांना करोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली. भारत एक जिवंत संस्कृती असून गेल्या काही वर्षात भारत एक स्वाभिमानी डिजिटल महासत्ता म्हणून उदयाला आला आहे असे त्यांनी सांगितले.
राजदूत फ्रेडी स्वेन यांचे राज्यात स्वागत करताना डेन्मार्क व महाराष्ट्रातील सहकार्य अधिक वृद्धिंगत होण्यासाठी आपण व्यक्तिशः लक्ष देऊ, असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले.
बैठकीला डेन्मार्कचे व्यापार व वाणिज्य प्रमुख सोरेन कॅनिक मारकार्डसेन तसेच डेन्मार्कचे मुंबईतील उप-वाणिज्यदूत हेन्री करकाडा उपस्थित होते.