खून प्रकरणातील चौघांना सहा वर्ष सश्रम कारावास
बारामती : अंगावर पाणी उडवल्याचा राग मनात धरून केलेल्या खून प्रकरणातील चौघांना बारामती जिल्हा व सत्र न्यायाधीश जे .ए. शेख यांनी सहा वर्ष सश्रम कारावास व 10 हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. भांडगाव (ता. दौंड) येथे (2011) मध्ये ही घटना घडली होती. याबाबत 23 मार्च 2011 रोजी मनीषा महेंद्र नागवडे (रा. खामगाव ता. दौंड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली होती.
22 मार्च 2011 रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा मुलगा आकाश, भावाचा मुलगा अक्षय, बहिणीचा मुलगा श्रीनाथ असे घरासमोर असलेल्या गेटजवळ गप्पा मारत बसलेले असताना सगळी मुले नदीवर पोहण्यास गेल्यावर त्यांच्याकडून सतीश नागवडे याच्या अंगावर पाणी उडाल्याच्या कारणावरून आरोपी राजेंद्र भगवान मोडक, जालिंदर उर्फ अण्णा बाळासाहेब येळवंडे, सतीश विष्णू नागवडे, विजय सावळा तांबे, अविनाश रमण शेळके, बाळासाहेब बबन ढमाळ, दिलीप रंगनाथ सावंत (सर्व रा. खामगाव ता. दौंड) यांनी पोहताना पाणी उडाल्याच्या कारणावरून बहिणीचा मुलगा श्रीनाथ विजय लेंडगे यांस व इतर सर्वांना आरोपींनी काठीने, हाताने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली होती.
या मारहाणीत श्रीनाथ लेंडगे यांस गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयासमोर सुरू असलेल्या खटल्यात आरोपींविरुद्ध सबळ पुरावा मिळाल्याने या गुन्ह्यामध्ये दोषी धरून आरोपी राजेंद्र भगवान मोडक, जालिंदर उर्फ अण्णा बाळासाहेब येळवंडे, सतीश विष्णू नागवडे, विजय सावळा तांबे यांना 6 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 2 महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली.
अविनाश रमण शेळके, बाळासाहेब बबन ढमाळ, दिलीप रंगनाथ सावंत यांची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. साक्षी, पुरावे तसेच सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला.