‘नागपूर-हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू करण्याची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची रेल्वेमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । विदर्भातील चारही जिल्ह्यांचा हैद्राबादशी जवळचा व्यापारी संबंध असल्याने नागपूर-हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस लवकर सुरू करावी अशी मागणी वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर आणि गोंदियाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्र लिहून केली आहे.
नागपूर हे मध्य भारतातील मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांना जवळचे सगळ्यात मोठे शहर आहे. तसेच ते एक औद्योगिक शहर आहे. तर हैद्राबाद हे दक्षिणेकडील सर्वात मोठे पर्यटन केंद्र आणि औद्योगिक शहर आहे. नागपूर ते हैद्राबाद जोडणाऱ्या सध्या २२ रेल्वे गाड्या असल्या तरी ५७५ किलोमिटरचे हे अंतर पार करणारी वेगवान गाडी असणे आवश्यक आहे. नागपूर सोबतच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांनाही या वंदे भारत एक्सप्रेसचा फायदा होईल. या भागात येणारे पर्यटक, व्यापारी आणि उद्योजक यांच्या सोयी करिता नागपूर- हैद्राबाद जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस तातडीने सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे वनमंत्री मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.