मत्स्य व्यवसाय करणाऱ्या महिलांनी आणि संस्थांनी सर्वोत्कृष्ट बनण्याबरोबरच सर्वप्रथम बनण्यास प्राधान्य द्यावे – आयुक्त अतुल पाटणे
मुंबई : मत्स्य व्यवसाय करणाऱ्या महिला व संस्थांनी मत्स्य उत्पादनातून खाद्यपदार्थासह विविध उत्पादन करणे गरजेचे आहे. महिलांनी आणि संस्थांनी सर्वोत्कृष्ट बनण्याबरोबरच सर्वप्रथम बनण्यास प्राधान्य द्यावे, असे मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ आणि केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विकास यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी एक दिवसीय जागृती व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे विभागीय संचालक विनीत नारायण, नाशिक महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा शशिताई अहिरे, सहकार भारतीचे सचिव डॉक्टर उदयराव जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आयुक्त श्री.पाटणे म्हणाले, महिलांसाठी शासनाच्या वतीने कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे. मत्स्य व्यवसाय करणाऱ्या संस्था आणि महिलांना विविध प्रकारची साधने देऊन मत्स्य उत्पादन व विक्रीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. महिला सक्षमीकरणाकरीता शासनाकडून मदत देण्यात येत आहे. नावीन्यपूर्ण व पारंपरिक मत्स्यव्यवसाय करण्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य देण्यात येत आहेत.
अवैध पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. एलईडीच्या माध्यमातून मासेमारी करणे चुकीचे असून महिलांनी आपल्या घरातील मासेमारी करणाऱ्या पुरुषांना एलईडीप्रकाशात मासेमारी करू नये असे सुचवावे. तसेच मत्स्य प्रजनन कालावधीमध्ये मासेमारी करू नये, यामुळे मत्स्य उत्पादनात दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.
लहान लहान गोष्टीच्या माध्यमातून व्यवसाय करता येऊ शकतो. घरपोच विक्री करणे, ॲप तयार करून त्या माध्यमातून मत्स्य विक्री करणे तसेच आधुनिक बाजार पद्धतीचा अवलंब करून व्यवसायवृद्धी करता येऊ शकते, असे श्री पाटणे यांनी यावेळी सांगितले. उपस्थित मान्यवरांनी मनोगत मांडले. मत्स्य व्यवसाय करणाऱ्या महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या.