जांबुटके येथे साकारणार पहिले औद्योगिक क्लस्टर आदिवासींच्या कलागुणांना मिळणार व्यापक बाजारपेठ – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ
नाशिक : आदिवासी बांधवांच्या कलागुण व कौशल्याला वाव देण्यासाठी पहिले आदिवासी औद्योगिक क्लस्टर जांबुटके साकारणार असून या माध्यमातून मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले. आज गोल्फ क्लब येथील इदगाह मैदानावर आयोजित आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आयोजित आदि महोत्सव उद्घाटन प्रसंगी कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आयुक्त (भा.प्र.से) डॉ. राजेंद्र भारूड, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, अपर आदिवासी आयुक्त संदिप गोलाईत, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय कळवण नाशिक विकास मिना, डॉ. साहेबराव झिरवाळ, हिरामण झिरवाळ, मोहन गावंडे आदी उपस्थित होते.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष म्हणाले की, आदिवासी बांधवांमध्ये कला व कौशल्य उपजतच असून जांबुटके येथे साकारण्यात येणाऱ्या औद्योगिक क्लस्टरच्या माध्यमातून हे स्वप्न साकार होणार आहे. या ठिकाणी सर्व प्रकारच्या आदिवासी
उद्योजकांना आपल्या कलावस्तू विक्रीसाठी संधी असणार आहे. त्यांना या ठिकाणी उद्योगासाठी लागणारे भांडवल, जागा, वीज व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या ठिकाणी नाशिकसोबतच महाराष्ट्रातील इतर आदिवासी जिल्ह्यातील तरूण उद्योजकांना सुध्दा रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ पुढे म्हणाले, 27 मे 31 मे 2022 या पाच दिवसांच्या कालावधीत होणाऱ्या या आदि महोत्सवास सर्वांनी भेट द्यावी. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आदिवासी तरूण बांधवानी मनातील न्युनगंड दूर करून व्यवसायाभिमुख व्हावे हाच प्रयत्न आहे. या ठिकाणी विक्री करतांना आदिवासी तरूणांनी बोलते होत पुढे आले पाहिजे. आदिवासी बांधवांनी पिकविलेला सेंद्रीय भाजीपाल्यास कोरोना काळातही विशेष मागणी झाली आहे. श्री. नरहरी झिरवाळ यांनी आज या ठिकाणी उभारलेल्या 36 स्टॉलला भेट दिली व स्टॉलधारकांशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व मान्यवरांच्या हस्ते आदि संस्कृती या कॉफीटेबल बुकचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आयुक्त (भा.प्र.से) डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले.