नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही
मुंबई । सह्याद्री लाइव्ह। नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही, अशी ग्वाही देतानाच सुरजागड स्टील प्रकल्पामुळे सुमारे सहा हजार जणांना रोजगार मिळाला आहे. विधानसभा सदस्य धर्मराव बाबा आत्राम यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य आत्राम यांना मिळालेल्या धमकीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य दिलीप वळसे पाटील, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांनी मुद्दा उपस्थित केला होता.
यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड स्टील प्रकल्पामुळे या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे सहा हजार जणांना रोजगार मिळाला असून कोनसरी येथील प्रकल्प उभारल्यानंतर दहा हजार जणांना रोजगार मिळेल, असेही त्यांनी सांगितले. विधानसभा सदस्य आत्राम यांच्या सुरक्षेत कुठलीही कमतरता राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.