साबळेवाडीतील शेतक-यांना मिळणार जमीनीचे २८ वर्षांचे भूभाडे
चासकमान पाठबंधारे विभागाची माहिती
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । खेड तालुक्यातील साबळेवाडी येथील चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या वितरिकेसाठी शासनाने जमीन संपादित केली होती. परंतू या जमीनीचा मोबदला शेतक-यांना दिला गेला नव्हता. आता २८ वर्षांनंतर शेतक-यांना त्या जमीनीचा मोबदला म्हणजे भूभाडे मिळणार आहे, अशी माहिती पाठबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ यांनी दिली.
१९९५ मध्ये शासनाने चासकमान डाव्या कालव्यासाठी कब्जापावती करून शेतक-यांकडून जमीनी घेतल्या होत्या. संबधित शेतक-यांना त्या जमीनींचा मोबदला दिला गेला नव्हता. पुढे २०१३ मध्ये आलेल्या नवीन भूसंपादन कायद्यामुळे पुर्वीची संपादन प्रक्रिया रद्द झाली. त्यामुळे शेतक-यांना जमीनींचा मोबदला मिळणार की भूभाडे याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता.
त्याबाबतीत बाधित शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुणे पाठबंधारे प्रकल्प मंडळाच्या अधिक्षकांना निवेदन दिले होते. त्यानंतर यासंदर्भातील सुधारित प्रशासकीय अहवालास शासनाची मंजूरी प्राप्त झाली. त्यानुसार ज्या क्षेत्रामध्ये बंदिस्त नलिका वितरण प्रणाली प्रस्तावित केली त्या क्षेत्राचे संपादन न करता संबधित शेतक-यांना त्या क्षेत्राचे भूभाडे देऊन संबधित शेतक-यांच्या जमीनी त्यांना परत करण्यात येणार आहेत.