उद्योगस्नेही धोरणाद्वारे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातही गुंतवणूक वाढविण्यावर भर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई। सह्याद्री लाइव्ह। अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे. या क्षेत्रात विकास करण्यासाठी मोठी संधी असून या क्षेत्रात ठरविलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी उद्योगस्नेही धोरणावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA)च्या सिंगल विंडो पोर्टलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महाऊर्जाचे महासंचालक रविंद्र जगताप, महानिर्मितीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी. अन्बलगन, संचालक विश्वास पाठक संचालक योगेश गडकरी, महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक सुरज वाघमारे, महाव्यवस्थापक (प्रशासन) रेश्मा माळी, महाव्यवस्थापक प्रकल्प आनंद रायदुर्ग, महाव्यवस्थापक (पवन ऊर्जा) मनोज पिसे, महाव्यवस्थापक (सौर), विनोद शिरसाठ, महाव्यवस्थापक (ऊर्जा संवर्धन) तगडपल्लीवर, महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक देविदास कुलकर्णी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातही मोठी गुंतवणूकही होत आहे. गुंतवणूकदार व विकासकांना उद्योग उभारण्यासाठी ‘इज ऑफ डुईंग’ अत्यंत महत्त्वपूर्ण असते. त्यादृष्टीने ‘महाऊर्जा’ने विकसित केलेले सिंगल विंडो पोर्टल गुंतवणूकदार व विकासकांसाठी खूप उपयोगी ठरणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला म्हणाल्या, प्रत्येक क्षेत्रात ऊर्जेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता अपारंपरिक ऊर्जा निर्मिती आणि वापराला अधिक चालना देणे गरजेचे झाले आहे. त्यादृष्टीने या क्षेत्रात गुंतवणूकदार व विकासकांना साह्यभूत ठरेल असे सिंगल विंडो पोर्टल तयार करण्यात आले असल्याचे शुक्ला यांनी सांगितले.
महाऊर्जाचे महासंचालक रविंद्र जगताप म्हणाले, एक खिड़की ऑनलाईन वेब पोर्टल कार्यान्वित करण्यासाठी महावितरण, महापारेषण, राज्यभार प्रेषण केंद्र व मुख्य विद्युत निरीक्षक कार्यालय यांच्याशी समन्वय साधून, त्याअनुषंगाने विविध टप्प्यांवर परवानगीसाठी लागणारा वेळ हा कमीत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्प विकासक, प्रकल्प गुंतवणूकदार यांना मंजुरीसाठी लागणाऱ्या वेळेत बचत होणार असून राज्यात अपारंपरिक ऊर्जा धोरणांतर्गत नवीन गुंतवणूक होण्यास मदत होणार आहे.
महाऊर्जाचे महाव्यवस्थापक आनंद रायदुर्ग यांनी एक खिडकी वेब पोर्टल विकसित करणेसाठी कार्यरत असणाऱ्या संबंधित संस्थांचे अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले.