ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची निवडणूक आयोगाची परवानगी
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाने दिली. निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना १ डिसेंबर रोजी पत्र निर्गमित केले आहे. वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविणयात आले आहेत. ३० नोव्हेंबरपासून आयोगाची वेबसाइट अतिशय मंदगतीने सुरु असल्याने उमेदवारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, ते अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक आयोगाकड़े केली. या मागणीस आयोगातर्फे सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन देखील दिले. निवडणूक आयोगातर्फे तातडीने दखल घेतली गेली व सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारण्याचे निर्देश देण्यात आले आहे.