टीईटी गैरव्यवहार तपासासाठी आठ पथके
ॲन्टिकरप्शनकडून मागवली तुकाराम सुपेची "कुंडली'
पुणे : आरोग्य विभाग, म्हाडा प्रश्नपत्रिका फूटप्रकरण तसेच शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहाराची व्याप्ती राज्यभरात पसरली आहे. यामध्ये काही कोचिंग क्लासचालक, दलालांची साखळी कार्यरत असल्याचे तपासात उघडकीस आले. या प्रकरणांचा तपास पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखा करत आहे. गैरव्यवहारांच्या तपासासाठी सायबर तसेच गुन्हे शाखेच्या आठ पथके तयार करण्यात आली आहेत.
दरम्यान, सुपे याच्यावर 2018 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कारवाई केल्याची माहिती पुढे आली आहे. परीक्षांतील गैरव्यवहार प्रकरणांत परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपेसह तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक करण्यात आली. “टीईट’मध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, शेकडो अपात्र उमेदवारांना पात्र ठरविल्याची माहिती प्राथमिक चौकशीत मिळाली आहे.
संबंधित प्रश्नपत्रिका तसेच तांत्रिक बाबींची जबाबदारी जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीज कंपनीकडे होती. त्यांच्याकडे पोलीस भरती परीक्षांचेही काम होते. कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख हा गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार असून, त्यानेच सुपे, सावरीकर यांच्याबरोबर संगमनत करून गैरप्रकार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तर, सुपे याच्यावरील दाखल प्रकरणाची सविस्तर माहिती देण्याबाबत सायबर पोलिसांनी ऍन्टिकरप्शनला पत्रही पाठवण्यात आले आहे.
प्रश्नपत्रिका फूट प्रकरणाची व्याप्ती राज्यातील वेगवेगळ्या भागात आहे. पुणे पोलिसांची पथके औरंगाबाद येथे तपासासाठी गेली आहेत. गैरव्यवहार प्रकरणातील दलालांचा शोध घेण्यात येत आहे. याशिवाय सायबर पोलिसांची पाच पथके तपास करत आहेत. गुन्हे शाखेची तीन पथके सायबर पोलिसांच्या पथकांना मदत करणार आहेत.
– भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त, सायबर गुन्हे शाखा