एमटीडीसीच्या माध्यमातून कृषि पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न – राज्यमंत्री आदिती तटकरे
पुणे : महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून कृषि पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न करण्यात येत असून त्याद्वारे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले. खेड तालुक्यात कुरकुंडे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेच्या नवीन इमारतीत स्थलांतर कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, निर्मला पानसरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, सहायक निबंधक हरीचंद्र खेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप चव्हाण, दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, माजी सभापती मार्केट समिती चाकण रमेश राजे, वरिष्ठ अधिकारी गौतम कोतवाल, सरपंच सागर जावळे आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, ग्रामीण भागात ‘ॲग्रो टुरिझम’ला चांगली संधी आहे. सहकारी संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यावा. प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर झाल्यास निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील एक उत्कृष्ट संस्था असल्याचे नमूद करून त्या म्हणाल्या, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बँकेने दर्जा टिकवावा.
कुरकुंडे शाखेच्या नवीन इमारतीचे कामकाज चांगले झाले आहे. या ठिकाणी ग्राहकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना परराज्यात शिक्षणासाठी पाठवण्यासाठी बॅंकेच्या माध्यमातून मदत होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करताना त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.यावेळी तालुक्यात ९० टक्क्यापर्यंत वसुली करणाऱ्या विविध सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचा राज्यमंत्री तटकरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार मोहिते पाटील आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दुर्गाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
आडगाव येथे पुलाचे भूमिपूजन
कार्यक्रमानंतर राज्यमंत्री तटकरे यांच्या हस्ते आडगाव येथील नाबार्ड अर्थसाहाय्याने उभारण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे, सरपंच प्रकाश गोपाळे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.