‘महाज्योती’च्या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करा – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार
नागपूर : इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग या प्रवर्गातील व्यक्तींच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी विविध योजना, उपक्रमांची ‘महाज्योती’मार्फत प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले.
सामाजिक न्याय भवन येथे महाज्योतीच्या संचालक मंडळाची बैठक वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. महाज्योतीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. महाज्योतीचे सदस्य लक्ष्मण वडले, दिवाकर गमे, बबनराव तायवाडे, व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे, समाजकल्याण उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, मुख्य लेखा वित्त अधिकारी अतुलकुमार वासनिक, कंपनी सेक्रेटरी अविनाश गंदेवार, प्रकल्प अधिकारी कुणाल सिरसाठे आदी यावेळी उपस्थित होते.
समाजातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या कमकुवत घटकांच्या सर्वसमावेशक सर्वांगिण शाश्वत विकासासाठी ‘महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून संस्थेमार्फत मागासवर्गियांसाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, संशोधन, रोजगारभिमुख वृध्दी, कौशल्यविकास, स्वयंरोजगार, ग्रामीण विकास, शेती विकास, व्यक्तिमत्व विकास , स्पर्धात्मकता विकास, सामाजिक ऐक्य व सलोखा आणि तत्सम क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवावे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील जातींचा इतिहास, संस्कृती, चालीरीती, रुढी-परंपरा, पारंपारिक व्यवसाय आदींची माहिती तसेच समग्र वाङमयाची निर्मिती महाज्योतीतर्फे करण्यात येणार आहे. त्यामध्ये पाच खंडांचा समावेश असून या खंडांची छपाई शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार येथून करण्यात येईल, यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे, असे आदेश महाज्योती प्रशासनास त्यांनी दिले.
महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुषंगाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना युपीएससी, एमपीएसी स्पर्धा परीक्षेसंदर्भात दिल्ली येथील नामांकीत संस्थेत प्रशिक्षण व पंधराशे रुपये प्रतीमाह छात्रवृत्ती (स्टायपेंड) दिल्या जाते. डॉक्टरेट (पीएचडी) करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. जेईई, नीट व एमएचसीइटी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना टॅब पुरवठा केला जाणार असून प्रशिक्षण सुविधाही त्यांना पुरविल्या जाणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग नागरीसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी आर्थिक सहाय्य संस्थेव्दारे देण्यात येणार आहे. संस्थेव्दारे वैमानिक प्रशिक्षणाकरिता वीस विद्यार्थ्यांची निवड केल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी करडई तेलबिया उत्पादन प्रकल्पांतर्गत अर्थसहाय्य योजनेतून विदर्भातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी खते, किटकनाशक व पिक संवर्धक औषधीसाठी 2 हजार 200 रुपये अनुदान दिल्या जाईल. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित “तृतीय गुणरत्न” या उत्कृष्ठ नाटकाच्या प्रयोग सादरीकरणासाठी निर्मात्यांना व त्यांच्या चमूला अनुदान दिल्या जाईल. येत्या काळात मुंबई, रत्नागिरी व नांदेडे येथेही महाज्योतीचे कार्यालय स्थापन करण्यात येणार असून त्यामार्फत तेथील क्षेत्रातील मागासवर्गीयांना विविध योजनांचा लाभ दिला जाईल, असेही वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.