EDUCATION : पुणे विद्यापीठाचे कामकाज पूर्णत: ठप्प
परीक्षांसह प्रशासकीय कामकाजावरही परिणाम; शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा परिणाम
पुणे : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत संप सुरू केला आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठाचे कामकाज पूर्णत: ठप्प झाले असून, परीक्षांसह प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे.
राज्यातील अकृषी विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाची 58 महिन्यांची थकबाकी अदा करावी, अकृषी विद्यापीठातील पदांना सातवा वेतन आयोग लागू करावा, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दहा-वीस व तीस वर्षांच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारित योजना लागू करावी आदी प्रलंबित मागण्यांसाठी लक्ष वेधण्यासाठी हा संप पुकारला आहे.
तीन दिवसांपासून पुणे विद्यापीठातील प्रशासकीय कार्यालय बंद असून, कामकाज पूर्णत: विस्कळीत झाले आहे. कर्मचारी संपावर असल्याने कार्यालय कुलूप बंद होते. तसेच बहुतांश शैक्षणिक विभागही बंद होते. त्यामुळे कोणतेही कामकाज सध्या ठप्प झाले आहे. त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना संप स्थगीत करण्याचे सूचित केले आहे. त्यांच्या मागण्यांवर राज्य सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासित केले. मात्र, उच्च शिक्षण विभागाच्या मुख्य सचिवांकडून प्रलंबित मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा पवित्रा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे संप सुरू राहील, असे संघटनेने कळविले आहे.
संपावर त्वरित तोडगा काढा
कर्मचाऱ्यांच्या संपाला आमचा विरोध नाही. त्यांच्या मागण्यांवर आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे. हे सर्व विषय राज्य सरकारशी संबंधित आहेत. त्यामुळे राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या विचारात त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. लॉकडाऊनमुळे दीड वर्षे शैक्षणिक संस्था बंद होत्या. आता सर्व पूर्ववत होत असताना संपामुळे पुन्हा शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.