नवीन वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रूग्णालयाच्या माध्यमातून जिल्ह्यास मिळणार शिक्षण व आरोग्य सुविधा – केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार
नाशिक । सह्याद्री लाइव्ह । नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक राज्यात वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सुविधा पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचधर्तीवर जिल्ह्यात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक या संस्थेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रूग्णालयास राज्यशासनामार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
त्यामुळे जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणासह आरोग्य सुविधा मिळणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.
जिल्ह्यात पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मान्यता मिळण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांच्या समवेत नॅशनल मेडिकल कमिशन सोबत सातत्याने बैठका घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोग्य विषयक संकल्पनांना प्रत्यक्षात साकाराण्यात विशेष प्रयत्न केले आहेत. त्याअनुषंगाने नॅशनल मेडिकल कमिशन दिलेल्या मान्यतेनुसार जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था इमारत बांधकामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने 348 कोटी 41 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्याने केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
नॅशनल मेडीकल कमिशनकडे जिल्ह्यासाठी 100 विद्यार्थी क्षमता मिळावी याकरीता महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानेटकर यांनी देखील केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांच्यामार्फत शासनास मागणी केली होती. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 20.47 हेक्टर जागेलगतच्या 14.31 हेक्टर जागेवर इमारत बांधकामासाठी परवानगी देण्यात आली आहे.