दूधगंगा डावा कालव्यामुळे दिंडनेर्ली, नागाव, नंदगाव, दऱ्याचे वडगाव पंचक्रोशीत समृद्धी नांदणार- पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सिंचनाची परंपरा 50 वर्षाहून अधिकची आहे. लोकराजा शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे जिल्ह्यात धरणे उभारण्यात आली. सिंचन क्षेत्र वाढले आहे. पाण्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होतात, शेतकरी समृध्द होताना पाहणे हा गौरव आहे. दूधगंगा डावा कालव्यामुळे दिंडनेर्ली, नागाव, नंदगाव, दऱ्याचे वडगाव पंचक्रोशीत समृद्धी नांदणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.आज सकाळी दूधगंगा डावा कालवा पाणी प्रथमत: प्रवाहित होणाऱ्या पाण्याचे जलपूजनाचा कार्यक्रम नंदगाव कॅनोल रोड येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.
दूधगंगा डावा कालवा पाणी पूजून शुभप्रसंगी बोलताना पाटील म्हणाले की, या पंचक्रोशीतील पाण्याचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. या गावातील लोकांचे, सहकार्याचे व शेतकऱ्यांचे कौतुक करताना गंगा गावात आल्याने पाण्याचे नियोजन सुयोग्यरित्या करावे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सामुदायिक पध्दतीने उत्पन्न खर्च कमी करून उत्पन्न वाढले पाहिजे. नव्या युवा पिढीने एकत्र येवून एकत्रित शेती करून नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच बाजार वाढीस वाव दिला पाहिजे. जिल्ह्यात यावर्षी ड्रोन पध्दतीने शेतीचा प्रयोग करण्यास चालना देताना प्रायोगिक तत्वावर प्रयत्नही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी सांगितले की, या चारही गावातील पाण्याचा प्रश्न सोडविताना विशेष आनंद होतो आहे. सोबतचे शेतीसाठीही पाणी मिळाल्याने 4 हजार पेक्षा अधिक सिंचन क्षेत्रास याचा लाभ होऊन या भागातील शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी् येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गोकुळचे संचालक बाबासो चौगुले, प्रकाश पाटील, शिशिकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य संध्याराणी बेडगे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रगतशील शेतकरी रामचंद्र पाटील, पांडुरंग भांदिगरे, केडीसीसी बँकेचे संचालिका स्मिता गवळी, पंचायत समिती माजी उपसभापती सागर पाटील-निगवे, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, सहायक अभियंता अजिंक्य पाटील, दुधगंगा कालवे क्र.1 च्या कार्यकारी अभियंता विनया बदामी, करवीर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय पारीख, पंचक्रोशीतील संरपंच, उपसंरपंच तसेच विविध विकाससंस्था व पतसंस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
या जलपूजून कार्यक्रमाप्रसंगी कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी येथील कामाची माहिती देत, येथील पंचक्रोशीतील लोकांना पिण्याकरिता स्वच्छ पाणी तसेच शेतीसाठी पाण्याचा वापर करता येणार असल्याने त्यांचा विकास होईल. या कामासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या नियमित पाठपुराव्यामुळे या कामास पुर्णत्वास येताना आनंद होत आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस करवीर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय पारीख यांनी या गावातील कालव्यातील पाणी आणण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानत पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांचे ग्रामस्थांच्यावतीने मनापासून आभार मानत जाहीर सत्कार केला.
जलपूजन प्रसंगी विधीवत पूजा करून पालकमंत्री सतेज पाटील, ऋतुराज पाटील व अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता विनया बदामी तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी पंचक्रोशीतील महिलांनी विधीवत पुजेसाठी उत्साहाने गारवे आणले होते.
अशी आहे दूधगंगा कालवा कामाची सद्यस्थिती
दूधगंगा डावा कालवा 76 कि.मी. लांबीचा आहे. या प्रकल्पाद्वारे डाव्या कालव्यावरून राधानगरीतील 22 गावे, करवीर तालुक्यातील 11 गावे, कागल तालुक्यातील 8 गावे, हातकणंगले-2 गावे असे एकूण 43 गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. 1 ते 31 कि.मी. (माजगांवपर्यंत) कामे सन 2000 अखेर पूर्ण झाली आहेत. उर्वरित 32 ते 65कि.मी. पर्यंतची काम पूर्ण असून पाणी सोडणेकरिता कालवा तयार आहे. उर्वरित 66 ते 76 कि.मी. माहे जून 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे जवळपास 7 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.