डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने कृतिशील लेखक व संवेदनशील कार्यकर्ता हरपला – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने कृतिशील लेखक व संवेदनशील कार्यकर्ता हरपला, अशा शोकभावना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त करुन डॉ. अनिल अवचट यांना श्रद्धांजली वाहिली.
डॉ. अनिल अवचट यांचे निधन झाल्याचे कळल्यावर अतीव दुःख झाले. त्यांचा आणि माझा जवळजवळ पाच दशकांचा परिचय होता. सामाजिक चळवळीच्या निमित्ताने व युवक क्रांती दलाचे काम करत असताना अनेक शिबिरांमध्ये डॉ. अवचट यांच्या मार्गदर्शनपर विचारांचा फायदा झाला. अत्यंत संवेदनशील मनाबरोबरच कृतिशील लेखक आणि चळवळीचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती परिवर्तनाबद्दलची त्यांची दृष्टी सातत्याने सजग आणि संवेदनशील होती.
साहित्य सेवेबरोबरच अनेक सामाजिक उपक्रमांशी ते जोडले गेले होते. स्त्री आधार केंद्राच्या कार्यक्रमाला अनेक वेळेला त्यांना आम्ही निमंत्रित केले होते. अलीकडच्या काळात ते जरी आजारी असले तरी तल्लख स्मरणशक्ती, बुद्धीचातुर्य, समाजाबद्दलचा कनवाळूपणा, सहृदयता हे सर्व गुण त्यांच्यात कायम जागृत होते. या गुणांची त्यांनी आयुष्यभर जोपासना केली व तसेच ते जीवन जगले. अत्यंत निःस्वार्थी स्वभावाचे व्यक्तिमत्व, त्याचबरोबर समाजामध्ये आणि स्वतःमध्ये एक वेगळ्या प्रकारचे नाते तयार केलेला कार्यकर्ता, लेखक, नेता व संवेदनशील व्यक्ती गमावल्याने कला, साहित्य क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्राचे अपरिमित असे नुकसान झाले आहे, अशा शब्दात उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी डॉ. अवचट यांना श्रद्धांजली वाहिली.