धबधब्यांचे माहेरघर मंदोशीच्या निसर्गसंपदेचे पर्यटकांना लागले वेड…
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह ।
खेड तालुक्यातील धबधब्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदोशी गावाच्या भेटीसाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. पंधरा दिवसात सुमारे दोन हजार पर्यटकांनी या परिसराला भेट दिली आहे. या परिसरातील स्थानिकांच्या सहकार्याने सुरक्षित पर्यटन आणि निसर्ग दर्शनासाठी लोक पावसाळ्यातील दुर्मिळ संधीचा लाभ घेत आहेत.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील विविध सुळके आणि निसर्गसौंदर्यासोबतच या गावातील जागृत देवस्थान श्री काळभैरव मंदिर प्रसिद्ध आहे. जवळपास सर्वच मावळांमध्ये सरासरी शंभरपासून अडीचशे इंचापर्यंत पाऊस पडतो. चार महिने ओढे-नाले तुडुंब वाहतात.
सध्या भरपूर पावसामुळे हिरवीगार झाडी आणि वृक्षवेलींना बहर आलेला आहे. जणू काही स्वर्गातील सौंदर्यच फुलून जमीनीवर उतरले आहे. विपुल विविधतेने नटलेली हिरवीगार वनराई व लहान लहान वृक्षांपासून भरपूर उंचीचे वृक्षराज या भागात आलेल्या पर्यटकांना साद घालत आहेत. या भागात दोनशेहून अधिक वनस्पतींच्या जाती तसेच निरनिराळ्या वेली देखील भरपूर प्रमाणात आढळतात.
मावळातील जंगले म्हणजे मूर्तिमंत सृष्टिसौंदर्य, बहारदार पाने, फुले, फळे पाहिली की मन प्रसन्न व आनंदित होऊन जाते. या गावात येणाऱ्या पर्यटकांची ग्रामस्थ ही आस्थेने चौकशी करतात व आवश्यक ते सहकार्यही करतात. मंदोशी गावचे सरपंच एकनाथ तळपे व सामाजिक कार्यकर्ते दत्ता तिटकारे यांनी “इको व्हिलेज” मंदोशी व जावळेवाडी येथील पर्यटन विषयक सुविधांसाठी शासनाने मदत करावी अशी मागणी केली आहे.
लेखक – संजय नाईकरे. चास ता. खेड, जि. पुणे
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES