ज्ञानेश्वर शिक्षण संस्था हे माणूस घडवणारे विद्यापीठ : हभप चैतन्य महाराज वाडेकर
प्रतिनिधी : दिनेश कु-हाडे पाटील
आळंदी : मानवी जीवनात आयुष्य कसे जगावे, हे संत तुकाराम महाराजांची गाथा सांगते, तर आयुष्यातील समस्यांचे निवारण संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी करते. गाथेच्या विचाराने आपण आयुष्य जगले पाहिजे. मानवी जीवन कोणत्या दिशेने जात आहे, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. चांगल्या कर्माने आणि नीतीमत्तेने आयुष्य जगण्याची आवश्यकता आहे. तरुणपणातील आत्महत्या, भरकटलेल्या तरुणाईला रुळावर आणण्यासाठी संत साहित्याची नितांत गरज आहे. विद्यार्थ्यांनी नकारात्मक व्यक्तींची संगत बदलली पाहिजे. सकारात्मक व्यक्तींची संगत आपल्या जीवनात प्रभावी काम करते. गाथ्यातील विचाराला अंगिकारून त्याप्रमाणे जीवनात मार्गक्रमण केले पाहिजे. विचारांची देवाणघेवाण करणे फार मोठे काम आहे, असे मत सोशल मीडियाच्या माध्यमातून तरूण पिढीला प्रेरणादायी सकारात्मक विचार मांडणारे युवा कीर्तनकार हभप चैतन्य महाराज वाडेकर यांनी श्री क्षेत्र आळंदी येथे व्यक्त केले.
संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्यूनिअर कॉलेजमधील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप आणि शुभेच्छा समारंभ आणि शिष्यवृत्ती तसेच विविध स्पर्धेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा कीर्तनकार हभप चैतन्य महाराज वाडेकर होते. यावेळी संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, उद्योजक रवींद्र खेडकर, संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विश्वस्त प्रकाश काळे, प्राचार्य दीपक मुंगसे, अनिल वडगावकर, विवेक घुंडरे, युवराज लोखंडे, पत्रकार दिनेश कुऱ्हाडे तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यावेळी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना चैतन्य महाराज वाडेकर म्हणाले की, संत ज्ञानेश्वर विद्यालयात हे शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना चांगले संस्कार सुध्दा दिले जातात. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था ही माणूस घडवणारे विद्यापीठ आहे, या संस्थेतून बाहेर गेलेला विद्यार्थी कधीही वाया जाणार नाही कारण मी सुद्धा या संस्थेतून शालेय शिक्षण घेतले आहे, असे यावेळी वाडेकर महाराज यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, विश्वस्त प्रकाश काळे यांनी सुध्दा आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.