आधार पावलांना सामाजिक संस्थेकडून डेहणे येथील शाळकरी मुलांना शूज, सॉक्स वाटप
खेड । सह्याद्री लाइव्ह । आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या पायाला इजा होऊ नये म्हणून आधार पावलांना सामाजिक संस्थेच्या वतीने एक पाऊल पुढे टाकले. या सामाजिक संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून डेहणे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि शिवाजी विद्यालयातील पहिली ते सातवी इयत्तेतील सुमारे २०० शालेय विद्यार्थ्यांना शूज आणि सॉक्सचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक जीवन लेंडघर, संस्थेचे सभासद सुरेश जाधव, सुनील फुलवरे, गणेश लांडगे, सुमीत म्हेत्रे, धीरज केळकर, संतोष जगताप, हनुमंत खराबी यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक जीवन लेंडघर यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थी व ग्रामस्थांना दिली. केंद्रप्रमुख लोखंडे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन प्राचार्या सातकर यांनी केले. प्राचार्य भुजबळ यांनी आभार मानले.
दरम्यान, संस्थेचे हे सातवे वर्षे असून, आजपर्यंत खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात २८ गावांमधील ९५० विद्यार्थ्यांच्या पावलांना आधार देण्याचे कार्य केले आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उन, वारा, पाऊस यांचा सामना करावा लागतो. तसेच या भागातील विद्यार्थ्यांच्या आर्थिक स्थिती बिकट असते. त्यामुळे शाळकरी मुलांच्या पायाला इजा होतात. या इजा होऊ नयेत म्हणून आधार पावलांना या सामाजिक संस्थेतर्फे २५ जानेवारी आणि १५ ऑगस्टसाठी बूट वाटप केले जाते, असे संस्थेचे संस्थापक जीवन लेंडघर यांनी सांगितले.