पिंपरी बुद्रुक केंद्रातील १९ जिल्हा परिषद शाळांना अवांतर वाचनाच्या पुस्तकांचे वाटप
राजगुरुनगर : पुणे येथील वाचनवेड संस्था यांच्या विशेष सहकार्यातून व देहू येथील अभंग प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पिंपरी बुद्रुक (ता. खेड) येथील केंद्रातील १९ जिल्हा परिषद शाळांना अवांतर वाचनाच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम पिंपरीतील श्री सुमंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संपन्न झाला.
यावेळी अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विकास कंद, उपाध्यक्ष सचिन काळोखे, केंद्रप्रमुख खोडदे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, पंचायत समितीच्या प्रभारी सभापती वैशाली जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती कैलास गाळव, पुणे जिल्हा विद्यार्थी मनसेचे उपाध्यक्ष मंगेश सावंत, हभप सुप्रिया साठे ठाकूर, सरपंच मोनाली ठाकूर, उपसरपंच रोहिदास हुंडारे, पोलीस पाटील रवींद्र ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य गणेश हुंडारे, तेजस्विनी ठाकूर, धोंडीबा वाळुंज, सुधा भुजबळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मांजरेवाडी धर्मरायाची, मांजरेवाडी पिंपळाची, मलघेवाडी, पिंपरी बुद्रुक, लादवड, खरपुडी बुद्रुक, खरपुडी खुर्द, शिरोलीतील सावंतवाडी व ठाकरवाडी, रेटवडीतील सतारकावस्ती, घाटवस्ती व वरची ठाकरवाडी, निमगाव येथील देऊळवाडा व माणिकनगर आणि खरपुडीतील आंबेओहळ व मांडवळा या सर्व जिल्हा परिषद शाळांना पटसंख्येनुसार पुस्तकांचे वाटप स्थानिक शाळांचे मुख्याध्यापक व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्याकडे करण्यात आले.
माजी सरपंच विकास ठाकूर म्हणाले की, सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून खेड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना पुस्तक वाटप करण्याचा मानस व्यक्त केला.
यावेळी बाबाजी काळे, कैलास गाळव, प्रा. विकास कंद व हभप सुप्रिया साठे-ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले.